रानशेत महालक्ष्मी गड मार्ग स्थानिकांच्या श्रमदानातून खुला

    14-Sep-2025

कासा : रानशेत महालक्ष्मी गड हा परिसर धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे गडाच्या पायथ्याशी मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे गडावर जाणारा मुख्य रस्ता अरुंद झाला आणि भाविकांना तसेच स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पायी चालत जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावासामुळे मंदिराकडे जाणारा मुख्य रस्त्यावर दरड कोसळून रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना अडचणी सामोरे जावे लागत होते. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही. मात्र गडावरील पुजारी, स्थानिक दुकानदार आणि काही युवकांनी एकत्र येऊन श्रमदानाचा मार्ग निवडला. त्यांनी खडी, रेती व सिमेंट आणून रस्ता काँक्रीट केला. काही दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यात आला.

या उपक्रमामुळे गडावर येणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय स्थानिकांनी केलेल्या श्रमदानातून हे काम पूर्ण झाले. त्यामुळे सामाजिक एकतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे.

भाविकांनी व गावकऱ्यांनी या कार्याचे कौतुक केले असून भविष्यात अशा समस्या उद्भवल्यास प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






संबंधित मजकूर