मुंबई, केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली असल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे. त्यामुळे, ऑगस्ट महिन्याचा पगार (सप्टेंबरमध्ये मिळणारा) केवळ फेस ॲपवर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता आणण्यासाठी विविध विभागांचा आढावा घेणे सुरु केले आहे. त्यातून अनेक विषय पुढे येत आहे. आज, रायगड जिल्ह्यातील महसूलच्या कामकाजा आढावा घेण्यात आला. १५० दिवसांच्या कामकाजात या सर्व कामांचे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
महसूली अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर मंत्री बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या चार महिन्यांत महसूलमंत्री म्हणून सर्व जबाबदाऱ्या सांभाळत ८०० प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांकडेही एकही अर्धन्यायिक प्रकरण प्रलंबित राहू नये, असे त्यांनी बजावले. लोक अदालतीच्या माध्यमातून तक्रारी सोडवण्यावर भर देण्यास सांगितले. तहसीलदार आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, जेणेकरून संबंधितांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता वाटू नये, अशा पद्धतीने काम करावे. यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.