पुणे : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम ) ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमन, रमण प्रीत यांनी पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या अनौपचारिक पत्रकार संवाद परिषदेत बोलताना एव्हिएशन मॅनेजमेंट आणि एव्हिएशन इंजिनीअरिंग , तसेच सेमीकंडक्टर डिझाइन या अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश असलेले अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करणार असल्याची घोषणाही केली.
आपल्या संस्थेच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करताना त्यांनी उद्योगाशी सुसंगत व्यावसायिक अभ्यासक्रमांची आवश्यकता यावेळी अधोरेखित केली.यावेळी बोलताना प्रीत यांनी व्यावसायिक व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम हे रोजगारभिमुख असावेत, बाजारातील नव्याने विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणारे शिक्षण असावे यासाठी पीआयबीएम करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
संस्थेची प्रगती दर्शवताना, प्रीत यांनी चंदीगड आणि दुबई येथे कॅम्पससह पाच नवीन कॅम्पस उघडण्याची त्यांची योजना प्रत्यक्षात आली असल्याचे सांगितले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पीआयबीएमच्या शैक्षणिक मॉडेलला मान्यता मिळालेली असून उदयोन्मुख उद्योगांना पूरक असे नवीन अभ्यासक्रम सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रीत म्हणाले की, संस्थेमधील अध्यापन केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित नसून प्रत्यक्ष अनुभव घेतलेले उद्योजक आणि तज्ञ अभ्यासक्रमात बनवण्यात योगदान देत असल्यानेच यशोपताका फडकत असल्याचे सांगितले. प्राध्यापक केवळ पीएचडीधारक नसून, कॉर्पोरेट संस्कृतीचीही त्यांना सखोल माहिती आहे, ज्यामुळे त्यांच्या शिकवण्याला व्यावहारिकतेची जोड आहे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संस्थेच्या कामगिरीविषयी अभिमानाने बोलताना त्यांनी, १७,०००-१८,००० माजी विद्यार्थी सध्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे विशद केले .
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि सामाजिक जबाबदारी
प्रीत यांनी संस्थेच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनावरही प्रकाश टाकला. संस्थेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत प्रथमच फिनटेक आणि ॲग्री-टेक एमबीए अभ्यासक्रम सुरू केले असल्याचे तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत राहून, विद्यार्थ्यांना जागतिक करिअरच्या संधींसाठी सुसज्ज करण्यासाठी "ट्विनिंग प्रोग्राम्स" सुरू केले असल्याचे यावेळी सांगितले.
आर्थिक सहाय्य आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी योजना
अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांवर बोलताना, प्रीत यांनी ४० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांशी असलेल्या करारांबद्दल माहिती दिली. संस्थेने राबवलेल्या आगळ्या वेगळ्या 'उद्दीपन योजनेबद्दलही प्रीत यांनी सांगितले, ग्रामीण भागातील तसेच छोट्या शहरांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने हे उद्दीपन पोर्टल काम करीत असल्याचेही ते म्हणाले. पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यास आणि विविध उद्योगांमध्ये इंटर्नशिप मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रमण प्रीत यांनी चर्चेचा समारोप करताना, प्राध्यापक वर्गाच्या मूल्यांकनात आणि भविष्यातील अभ्यासक्रमांच्या विकासामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) भविष्यातील गरजेवर भर दिला. पीआयबीएम ही पुण्यातील सर्वोत्तम पीजीडीएम आणि एमबीए कॉलेजेसपैकी एक म्हणून मान्यताप्राप्त संस्था म्हणून उदयाला आली असून भविष्यात विदेशांत नाव कमावणारी संस्था बनणार असल्याचा दुर्दम्य आशावाद यावेळी व्यक्त केला.