मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या मंत्रिमंडळ बैठकीची सुरुवात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आणि खरीप हंगामातील पेरणी प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
राज्यात आतापर्यंत सुमारे 11.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ सरासरी 8% पेरण्या झाल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पावसामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, सर्व प्रकारची खते उपलब्ध ठेवावी तसेच गरज भासल्यास अतिरिक्त मागणी करावी, असे निर्देश दिले.
अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली व धाराशिव जिल्ह्यांत 100% पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना व लातूर जिल्ह्यांत 75-100%, तर ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यांत 50-75% पावसाची नोंद झाली आहे. पालघर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत 25-50% पाऊस तर नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत 25% पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, येत्या 2 ते 4 दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
धरणांमधील साठ्यातही वाढ होत असून, कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाशी समन्वय साधून 515 मीटरपर्यंत पाणीसाठा ठेवण्यासंदर्भात खात्री करण्यात आल्याची माहितीही जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी यावेळी दिली.