'औरंग्याच्या पिलावळींच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे' ; चित्रा वाघ
05-Mar-2025
Total Views |
मुंबई : ( Chitra Wagh ) “छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारणार्या औरंगजेबाचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उदो उदो केला. औरंगजेबाला उत्तम प्रशासकाची उपमा देत त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी बलिदान देणार्या सर्वच मावळ्यांचा अपमान केला आहे. औरंग्याची स्तुती करणार्या त्याच्या पिलावळींच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत,” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना दिली.
अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटले आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?
अबू आझमी यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. औरंगजेब आणि त्याचे वंशज हे काही हिंदुस्थानात पर्यटनाला आले नव्हते. त्यांनी हिंदुस्थानाला लुटले, हिंदू देव-देवतांची विटंबना केली, राज्यातील आणि देशातील महिलांच्या अब्रुशी खेळले. अशा औरंग्याची भलामण करणार्या त्याच्या पिलावळींच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत. आम्ही विधान परिषदेत अबू आझमींना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे औरंग्याच्या पिलावळीच्या नांग्या ठेचण्याचे काम नक्की करतील, असा मला विश्वास आहे.
मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. यावरून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर काय सांगाल?
फक्त मंत्र्यांच्या घरातील महिलाच नाही, तर राज्यातील सर्वसाधारण प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलगी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य असून आम्ही ते काम करत आहोत. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे काम केले आहे. त्यामुळे राजकारण किती खालच्या पातळीला जात आहे, हे या घटनेतून लक्षात येते. पण आम्ही कुणालाही सोडणार नाही. देवाभाऊंच्या सरकारमध्ये एकेकाला वेचून काढून त्यांच्यावर कारवाई होईल, हा विश्वास आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला विलंब झाल्याचा आरोप विरोधक करतात. याकडे कसे पाहता?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर काल आम्ही झोपू शकलो नाही, इतके विदारक दृश्य ते होते. ही माणसे नाही, तर जनावरे आहेत. त्यांना नुसती फाशी न देता, त्यांचे चामडे सोलून काढून मग फाशी द्यायला हवी. आपण त्रयस्थ आहोत, आपणच ते फोटो पाहू शकलो नाही, तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल? त्यामुळे या प्रकरणातील आका, आकाचा आका, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जो कुणी यात सहभागी असेल, त्या सगळ्यांना उचलून फेकून दिले पाहिजे आणि हे नक्की होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत म्हणून तो आका वाल्मिक कराड आज तुरुंगात आहे. या प्रकरणाचा आणखी तपास होईल. यात दोषी असणार्या कुणालाही सोडले जाणार नाही, हा माझा विश्वास आहे.