आम्ही हर्षल पाटीलला कंत्राट दिले नव्हते! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट, म्हणाले...
24-Jul-2025
Total Views | 34
मुंबई : आम्ही हर्षल पाटीलला कंत्राट दिले नव्हते. हे कंत्राट एका दुसऱ्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय कामाचे पैसे थकवल्याने हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आज सकाळी एक बैठक झाली, त्यावेळी मी सर्व माहिती घेतली. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हे कंत्राट एका दुसऱ्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. आमचा संबंध मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी येतो. उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं. तुमचे बिल येतील तसे आम्ही पैसे देऊ. समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कॉन्ट्रॅक्टर नेमले असेल, तर त्याला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही, तो अधिकार तुमचा आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "जल जीवन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत ५० टक्के निधी हा केंद्राचा तर ५० टक्के निधी हा राज्याचा असतो. त्यांचा निधी येईल तसे आपण तिथे अधिकचे पैसे देतो, कधी आपल्या निधीमधून देखील देतो. त्यामुळे आम्ही त्यांना कंत्राट दिलेले नव्हते. तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव जाणे किंवा त्याने स्वत: आत्महत्या करणे यामागे नेमकी काय कारणे आहेत? याचा तपास पोलीस यंत्रणा करतील. याबाबतीत मोबाईलसुद्धा तपासण्यात येत आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण त्याला आम्ही कंत्राट दिले नव्हते. दुसऱ्या कंत्राटदाराला आम्ही कंत्राट दिले होते," असेही ते म्हणाले.