मंत्री आदिती तटकरे : ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार
29-Jan-2025
Total Views |
मुंबई : राज्यभर अहिल्याभवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिले.
महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा त्यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी तसेच सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून महत्वाचे काम सुरू होणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यात अहिल्याभवनचे काम सुरू असून उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणारे हे अहिल्याभवन महिला, बालक आणि दिव्यांगांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज असून अहिल्याभवन उभारण्यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभाराव्या," असे निर्देश त्यांनी दिले. तसेच लवकरच ४ जिल्ह्यातील अहिल्याभवनचे लोकार्पण करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
५ हजार महिलांना 'पिंक ई-रिक्षा' वाटप करणार
"महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा'च्या योजनेसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी ५ हजार पात्र महिलांना लवकरच रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यावर राहणार्या मुलांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक कार्यरत आहे. या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत विभागाने ३ हजार पेक्षा जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी," अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गरजू महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात येणार
"नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर आवश्यक असून गरजू महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबतच पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच पाळणा सेविका, मदतनीस आणि निर्भया समुपदेशन केंद्रावरील समन्वयकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे," असे आश्वासनही आदिती तटकरे यांनी दिले.