३६ बुलडोझर, ७० ट्रॅक्टर-ट्रॉली; सोमनाथ येथील अतिक्रमणावर सरकारची तोडक कारवाई!

    28-Sep-2024
Total Views |

Somnath Illegal Construction

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Demolition Drive near Somnath) 
गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवत येथील सरकारने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुमारे ३६ बुलडोझर ही बेकायदा बांधकामे पाडण्यात गुंतले आहेत. तर ढिगारा हटवण्यासाठी तब्बल ७० ट्रॅक्टर-ट्रॉली तैनात करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मागील भागात अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. रात्री उशिरा प्रशासनाने ही कारवाई केली असता, कारवाई रोखण्यासाठी मोठा जमाव याठिकाणी जमला होता.

हे वाचलंत का? : ३ गावांतील ४०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी अनेक महिने याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमनाथ मंदिरामागील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण सध्या मोकळे करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत येथे अनेक नवीन कामे करण्यात आली असून या कारवाईनंतर सोमनाथ मंदिर कॉरिडॉरच्या बांधकामाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे. रात्री उशिरा अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. मात्र, कारवाई होताच स्थानिक नागरिकांचा जमाव तेथे जमा झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. लोकांनीही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसेतरी लोकांना तेथून हटवले आणि कारवाई पुन्हा सुरू झाली.


मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी चौदाशे पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या देखरेखीखाली अवैध बांधकाम पाडण्याचे काम सुरू होते. ही कारवाई आणखी काही काळ सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.