मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा याच ठिकाणी शिवरायांचा दिमाखदार पुतळा उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता कणकवली यांनी काढलेल्या निविदेनुसार, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्यासाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. इच्छुक शिल्पकारांना दि. ३ ऑक्टोबरपर्यंत शिवरायांच्या प्रस्तावित पुतळ्याचे ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करावे लागेल. त्यानंतर दि. ४ ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल.