मुंबई, दि.२७: उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देत तिकीटविरहित प्रवासास प्रतिबंध करण्यासाठी पश्चिम रेल्वे वेळोवेळी विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करते. विशेषत: मुंबई उपनगरी विभागात ही मोहीम राबविण्यात येते. या नियमित तिकीट तपासणी मोहिमेव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेने २३ आणि २४ ऑगस्ट रोजी एसी लोकल ट्रेनमध्ये दोन दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एसी लोकल ट्रेन सेवेमध्ये दोन दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली. या दोन दिवसांच्या तपासणीत एकूण १२७३ प्रवासी अनधिकृतपणे प्रवास करताना आढळून आले.
त्यांच्याकडून ४ लाखांहून अधिक रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. त्यापैकी पहिल्या दिवशी ५९५ प्रवाशांकडून तर दुसऱ्या दिवशी ६७८ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला. ही विशेष मोहीम सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी राबविण्यात आली. यावेळी वैध तिकीटाशिवाय गर्दीत प्रवास करू शकतात अशा मानसिकतेतून अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. पश्चिम रेल्वेने सर्व आदरणीय प्रवाशांना योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तिकीट बुकिंग काउंटर किंवा एटीव्हीएम मशीनद्वारे काही मिनिटात तिकीट मिळू शकते किंवा यूटीएस ॲपद्वारे ऑनलाइन तिकिटे खरेदी केले जाऊ शकते.