ठाण्यात धुवाँधार पावसाचे 'अधिवेशन'

१४० मि. मीटर पावसाची नोंद

    08-Jul-2024
Total Views |

Thane  
 
ठाणे : राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे. सोमवारी पहाटेपासुनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वाहतुकीचा बोजवारा उडाला.शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. सोमवारी दुपारी १२ वाजे पर्यंत ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्याना फटका बसला.
 
रेल्वे मार्गात पाणी तुंबल्याने लोकल तसेच अनेक लांब पल्याच्या गाड्या खोळंबल्या होत्या.परिणामी, ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांची झुंबड उडाली होती. रेल्वे ठप्प झाल्याने रिक्षा - टॅक्सी तसेच खाजगी वाहनांकडुन प्रवाश्यांची लूट केल्याचे दिसुन आले.
ठाणे जिल्ह्यात गेले काही दिवस ऊन - पावसाचा लंपडाव खेळणाऱ्या मान्सुनने रविवारी रात्रीपासून जोर धरला. सोमवारी पहाटे १:३० वाजल्यापासुन सकाळपर्यंत पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपुन काढले.
 
धुवाँधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यावर पाणी तुंबुन वाहतूक मंदावली होती. शहरातील वंदना सिनेमा, मुख्य बाजारपेठ,भास्कर कॉलनी, चिखलवाडी, दिवा आदी विविध ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. वसंतविहार भागात भलामोठा वृक्ष धराशाही झाला. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई - अहमदाबाद रोड,मुंबई- नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर रोड आणि नौपाडा, सिव्हील रूग्णालय परीसरात वाहतूक कोंडी झाली होती.
 
तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावरील भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने ठाणेहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. काही काळानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर काही अंशी रेल्वे सेवा सुरु झाली परंतु, रेल्वे गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत.कर्जत कसाराहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल गाड्या ठाणेपुढे जात नव्हत्या. तर अनेक लांब पल्याच्या गाड्याही खोळंबल्यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती.