मुंबई-अहमदाबाद शीघ्रसंचार मार्गाचे काम वेगात

अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात

    06-Jul-2024
Total Views |

hayway
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्ग ‘एनएच’ 48च्या आच्छाड ते दहिसर दरम्यानच्या 121 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ‘व्हाईट टॉपिंग’ म्हणजेच काँक्रीटीकरण करण्याचे काम सद्यःस्थितीत प्रगतीपथावर आहे. मात्र, वाहतूककोंडी, इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असणारी कामे आणि पावसाळा यामुळे कामांची गती मंदावली असल्याचे चित्र आहे. हा प्रकल्प एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याची माहिती ‘नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ (एनएचएआय) ने दिली.
 
गुजरातला देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा प्रमुख मार्ग मानल्या जाणार्‍या अहमदाबाद-मुंबई महामार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे. 2009 ते 2013मध्ये ‘आयआरबी’च्या माध्यमातून या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. दुपदरी असणारा हा महामार्ग चारपदरी करण्यात आला. मे 2022मध्ये सवलत कालावधी पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प 2022मध्ये ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित करण्यात आला. या महामार्गाची सद्यःस्थितीत दुरवस्था असून अनेक छोट्या-मोठ्या अपघातात अनेकांनी जीव गमावले आहेत.
 
मात्र तरीही या मार्गावर टोल वसुली मात्र चालू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकच नव्हे, तर पादचार्‍यांनाही धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर वाढती वाहतूक लक्षात घेता या मार्गावर दीर्घकालीन उपाय म्हणून ‘व्हाईट टॉपिंग’ म्हजेच काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. डिसेंबर,2024मध्ये ‘व्हाईट टॉपिंग’ करण्यास सुरुवात झाली.
डेब्रिज टाकल्याने समस्यामध्ये वाढ
 
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यात येते. यावर नियंत्रण मिळविण्यात अद्याप ‘एनएचएआय’ला यश आलेले नाही. त्यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे 3 पेट्रोलिंग वाहने आहेत, ज्याद्वारे 40 किमीची अंतरावर गस्त घेतली जाते. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तेथे वाहने पाठवली जातात आणि त्यादरम्यान महामार्गाच्या बाजूला बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकले जाते.