अंबर (अमूदान) स्फोटप्रकरणीदडविला जातोय मृतांचा आकडा

    08-Jun-2024
Total Views |
स्फोट फोटो  
 डोंबिवली (जान्हवी मोर्ये)  :  अंबर (अमूदान) स्फोटप्रकरणी आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू या कंपनीत अनेक जण रोजदांरीवरही कामासाठी येत असत. या स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने आजूबाजूच्या कंपनीनाही त्यांची झळ पोहोचली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा जास्त असतानाही तो लपविला जात असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांंनी व्यक्त केला आहे. हा आकडा लपविण्यामागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती आहे, याचा शोध घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.
 
अंबर स्फोट ही घटना दि. 23 मे रोजी दुपार दीडच्या सुमारास घडली होती. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 68 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर लगेचच दोन महिलांच्या मृतदेहांची ओळख पटली होती. त्यामध्ये रोहिणी कदम आणि सिद्धी खानविलकर यांचा समावेश होता. शनिवार, दि. 1 जून रोजी प्रशासनाकडून शोधकार्य थांबविण्यात आले होते. मात्र नातेवाईकांनी दबाव आणल्याने पुन्हा ही मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान राकेश राजपूत आणि जय सरकार यांची ओळख पटली. या घटनेत अजूनही काही जण बेपत्ता आहेत. तर घटनास्थळावरून शरिराचे काही अवशेष मिळाले आहेत.
 
त्यानंतर नातेवाईकांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनंतर गुरूवार, दि. 5 जून रोजी आणखी पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यामध्ये विशाल पौडवाल, रवी राजभर, मनिष दास, मनोज चव्हाण आणि भरत जायस्वार यांची ओळख पटली आहे. या घटनेत बेपत्ता व्यक्तींचा ‘रेकॉर्ड’ दाखविला जात नाही. ज्यांचा ‘रेकॉर्ड’ आहे, तीच व्यक्ती ‘मिसिंग’ मध्ये दिसत आहे. या घटनेत चार टन लोखंड वितळले आहे. मग माणसांची राख झाली आहे का?, कंपनीत ‘रिअ‍ॅक्टर’साठी उत्पादन ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. कंपनीची जागा केमिकल झोन नसून ‘इंड्रस्टीयल झोन’ होती. त्या कामगारांची कंपनीकडे कोणातीही माहिती नाही किंवा त्यांच्याशी कोणताही करार केलेला नव्हता, अशी माहिती स्थानिकांनी नाव न सांगण्याच्या अटींवर दिली आहे.
 त्या व्यक्तींची यादी मिळेना
 उल्हासनगरचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्याकडे तपास सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्फोटात 13 जण मृत असल्याची माहिती दिली. बेपत्ता व्यक्तींची यादी माझ्याकडे नाही. ती मानपाडा पोलीस स्थानकात मिळेल, असे सांगितले. मानपाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शोधकार्यसुद्धा धीम्या गतीने या स्फोटात जे बेपत्ता
आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळणार नाही.
 
पण जे लोक या घटनेत बेपत्ता झाले आहेत. ते कुठे गेले. फारतर एखादी व्यक्ती एखाद्या रुग्णालयात जाऊ शकते. या स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने कुणीही स्वत:च्या पायाने लांबवर जाऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या कंपनीत फक्त 12 जण काम करत होते. ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? प्रशासनाने शोधकार्यसुद्धा धीम्या गतीने केले. परिसर स्वच्छ करताना जे मिळाले ते बाजूला केले. पण 40 जण तिथे होते. त्यांना शोधायचे ही वृत्ती ठेवून काम झाले नाही. पोलीस तक्रार किती आहेत, याची पडताळणी करावी. 35 ते 40 जण तरी कमीत कमी हा आकडा असला पाहिजे.
 - नीलेश काळे, स्थानिक