शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेणे हे भाग्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    10-Jun-2024
Total Views |
Narendra Modi news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालयात पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचे २० हजार कोटी रुपये जारी करण्याच्या पहिल्याच निर्णयावर स्वाक्षरी केली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत २० हजार कोटी रुपये जारी करण्यात येणार असून त्याचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, आमचे सरकार देशभरातील आमच्या शेतकरी बंधू-भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासाठी पहिले काम करण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या अंतर्गत, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ज्यामुळे देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी काळातही आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी काम करत राहू, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सत्ताकेंद्र नव्हे तर जनतेसाठी काम करणारे कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यालयातील अर्थात पीएमओमधील कर्मचाऱ्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात १० वर्षांपूर्वी पीएमओविषयी जनतेच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. पीएमओ हे एक खूप मोठे सत्ताकेंद्र असल्याचा समज होता. मात्र, पीएमओ सत्ताकेंद्र असावे; अशी आपली इच्छा नाही. आमचे उद्दिष्ट पीएमओबाबत ऊर्जा प्रवाही ठेवण्याचे आहे. येथून नवचैतन्य पसरत रहावे आणि जनतेची अविरत सेवा सुरू रहावी आणि हे जनतेचे पीएमओ व्हावे, अशी आपली भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.