डोंबिवलीतील स्टार्टअप प्रदर्शनात ६० नवउद्योजकांचा सहभाग

    10-Jun-2024
Total Views |

dombivli
डोंबिवली :‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे भरविण्यात आलेल्या स्टार्टअप प्रदर्शनाला डोंबिवलीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरांमधील 60 नवउद्योजकांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे.
डोंबिवलीतील नामांकित संस्थांपैकी ‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ हे एक आहे. यंदा हे मंडळ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
 
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री गणेशोत्सवामध्ये कार्यकर्ते आणि नगरवासीयांकरिता अनेक धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दरवर्षी श्री गणेशोत्सवादरम्यान होणारे प्रदर्शन यंदा दि. 8 आणि दि. 9 जून रोजी डोंबिवलीतील सर्वेश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध प्रकारची प्रिमिक्स, घरगुती पीठे, मसाले, महिलांसाठी विविध प्रकारचे अलंकार, सौंदर्यप्रसाधने आणि कपडे तसेच गृह सुशोभीकरणाच्या वस्तू, कपड्यांची खेळणी या वस्तूंचे उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
 
दिवंगत संगीता आनंद फाटक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या प्रदर्शनाच्या सभागृहाचे प्रायोजकत्व देण्यात आले आहे. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने विशेष सहकार्य केले आहे. मंडळाचे सहकार्यवाह केदार पाध्ये यांनी सर्व स्टॉलधारकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. डोंबिवलीकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवउद्योजकांना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी डोंबिवलीकरांना धन्यवाद दिले.