‘हर्बेरियमचे जनक ‘सुनील बर्वे’

    01-Jun-2024
Total Views |
talk with sunil barve



संगीतप्रेमी आणि बाबूजींच्या चाहत्यांना यंदा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात बाबूजींची भूमिका साकारत अभिनेते सुनील बर्वे यांनी एक अनोखी भेट देऊ केली. आजवर त्यांनी नाटके, मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केलेच. शिवाय ‘हर्बेरियम’ या रंगभूमीवरील विशेष उपक्रमातून त्यांनी ‘सूर्याची पिल्ले’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘हमीदाबाईची कोठी’ अशी अनेक जुनी अजरामर नाटके भेटीला आणली. याच प्रवासाबद्दल सुनील बर्वे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.

गाणे, तबला असे संगीतक्षेत्राशी निगडित शिक्षण घेतल्यामुळे अभिनयक्षेत्रात सुनील बर्वे कसे आले, असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्याचेच उत्तर देताना सुनील बर्वे म्हणाले की, “लहानपणापासून तसा मी खोडकर होतोच. सूरतालाशी माझी गट्टी जमते आहे, हे माझ्या आईने हेरले आणि मला गाण्याचे आणि तबलावादनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. एकीकडे संगीतक्षेत्रातील ज्ञान घेत होतोच, पण दुसरीकडे लोकांच्या नकला करणे किंवा कोणी गाणे गात असेल, तर ते कसे गात आहेत, याची नक्कल करून दाखवणे हे मी करत होतो आणि तेव्हाच मला जाणवले की, माझ्यात एक अभिनेता दडलेला आहे आणि मी कदाचित भविष्यात यातच करिअर करू शकतो आणि असा माझा अभिनयाचा प्रवास महाविद्यालयीन काळात सुरू झाला,” असे सुनील बर्वे म्हणाले.

“१९८५ साली बारावीच्या सुट्ट्यांमध्ये ‘लिटिल थिएटर’चे शिबीर केले. तेथे गेल्यावर माझ्या गळ्यात सूर असल्यामुळे माझी गाठ विनय आपटेंशी करून दिली गेली आणि मग त्यांच्या ‘अफलातून’ या नाटकापासून माझी अभिनय आणि गायन अशी सुरुवात झाली. विनय आपटे यांच्या तालमीत मी अभिनेता आणि गायक म्हणून खर्‍या अर्थाने घडलो. केवळ नाटक म्हणजे पडदा उघल्यावर जे सादरीकरण दिसते, तेवढेच नाटक नव्हे, तर खरे नाटक आणि तारेवरची कसरत ही पडद्यामागील कलाकार करत असतात. विनय आपटे यांच्याकडे तीन महिने तालीम केल्यानंतर ‘बॅकस्टॅज’ समजले आणि नाटक हे माझ्या जीवनातील अविभाज्य घटक झाले,” अशी कबुली देखील सुनील बर्वे यांनी दिली.

सुनील बर्वे यांचे कुटुंबदेखील अगदी सर्वसामान्यांसारखेच होते. पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी करायची आणि घराची जबाबदारी पाहायची, असे सुनील यांच्या आईवडिलांचे विचार होते, जे सर्व पालकांचे असतातच. ज्यावेळी अभिनय क्षेत्रातच पूर्णपणे काम करायचे आहे, असे सुनील बर्वे यांनी ठरवले, तेव्हा त्यांनी आईवडिलांना सांगितले, “मला पाच वर्षे द्या. मी नक्कीच नोकरी करताना कमवत होतो, तितके पैसे कमवीन आणि मुळात मी लग्न केले आहे, त्यामुळे बायकोची जबाबदारी असल्यामुळे घर सांभाळीनच,” अशी शाश्वती दिली आणि “पालकांनी, बायकोने मला साथ दिली,” असेही सुनील म्हणाले. शिवाय, “मराठी माणसाने व्यवसायात आले पाहिजे आणि तू ते पाऊल उचलले आहेस, असे माझ्या सासर्‍यांनी मला ठामपणे म्हटले आणि माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले,” असेही ते म्हणाले.

‘हर्बेरियम’ या त्यांच्या उपक्रमाबद्दल बोलताना सुनील बर्वे म्हणाले की, “मराठी रंगभूमीवर दिग्गज नाटककारांनी पुढच्या पिढीला अजरामर नाटके दिली आहेत. पण, आमच्या पिढीने आणि नाट्यक्षेत्रातील येणारी भावी पिढी यांनी जुनी नाटके पाहिली नाहीत. त्यांपैकी काही मोजकी अनमोल नाटके घेऊन त्यांचे ठराविक प्रयोग नवोदित दिग्दर्शक, कलाकारांना घेऊन करावे, असा विचार माझ्या मनात आला आणि ‘हर्बेरियम’हा उपक्रम मी सुरू केला. याची सुरुवात खरेतर मी अमेरिकेला पहिल्यांदा गेलो होतो, तेव्हा झाली. तेथे नाटक पाहायला येणार्‍या प्रेक्षकांना सादर होणार्‍या नाटकाची पार्श्वभूमी लेखी स्वरुपात दिली जाते. शिवाय, नाटक पाहायला येणारे प्रेक्षक आणि सादरकर्ते शिस्त पाळतात, ती आपल्याकडेदेखील असावी, असा मानसदेखील ‘हर्बेरियम’ सुरू करताना मनात होता.” हर्बेरियमच्या प्रयोगांची आठवण सांगताना सुनील बर्वे म्हणाले की, “प्रत्येक प्रयोगानंतर जुना आणि नवा प्रेक्षक भेटून या उपक्रमाला दाद द्यायचा आणि डोळ्यांत अश्रू, पण ओठांवर हसू घेऊन परत जायचा.”

यावेळी “नाटकक्षेत्र हे रांगोळी या कलेशी समरुप आहे,” असे म्हणत सुनील बर्वे म्हणाले की, “प्रत्येक कलाकाराने जीवनात एकदातरी नाटक करून पाहिले पाहिजे. तुम्ही किती नाटके केली, त्यापेक्षा तुम्ही नाटकाचे किती प्रयोग केले, यावरून तुम्हाला नट म्हणून तुमचे महत्त्व समजेल. नाटक ही कला रांगोळीसारखी आहे. आज जशी सुरेख रांगोळी आली, तशीच उद्या येईल, याची खात्री नाही. तसेच, आजचा नाटकाचा प्रयोग रंगला, तसाच उद्या रंगेल की नाही, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.”

योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपटात सुनील बर्वे यांनी बाबूजींची भूमिका साकारली आहे. त्यांच्याबद्दल आठवण सांगताना सुनील बर्वे म्हणाले की, “बाबूजींशी वैयक्तिकरित्या भेटणे ‘वीर सावरकर’ या चित्रपटाच्या वेळी झाले होते. त्यावेळी सेनापती बापट यांच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती. पण, कालांतराने चित्रपटाचे दिग्दर्शक बदलल्यामुळे ती भूमिका माझ्याकडून झाली नाही. पण, बाबूजींशी झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहील आणि दुसरी एक आठवण म्हणजे त्यांच्या पंचाहत्तीनिमित्त ‘स्वरतीर्थ’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते आणि त्यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मी केले होते आणि आजही माझ्याकडे त्या कार्यक्रमाचे स्वरुप लिखितरुपात आहे आणि त्या पुस्तकावर सुधीर फडके, ललिताबाई फडके, बाबासाहेब पुरंदरे, मीनाताई ठाकरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.”

सुनील बर्वे सध्या ‘संस्कार भारती’चे कोकण प्रांताचे अध्यक्ष असून, त्यांचा आणि रा. स्व. संघाचा कसा संबंध आला, याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी शाखेत जाणारा स्वयंसेवक कधीच नव्हतो. पण, आईवडिलांकडून मला जी संघाची शिस्त आणि विचारधारा मिळाली, त्यामुळे मी संघाशी जोडला गेलो. ज्यावेळी मी ‘संस्कार भारती’चा उपाध्यक्ष झालो, त्यावेळी संघाच्या विचारांशी माझी अधिक ओळख झाली आणि त्याचवेळी संघाच्या कामाची व्याप्ती किती आहे, याबद्दलही मला समजले. पण, एवढे मोठे कार्य फार उशीराने कळले, याचे दुःख मला नक्कीच झाले. ज्या निर्व्याज, निरपेक्ष भावनेने संघाचे काम सुरू आहे, ते विलक्षण आहे. उगाच कोणत्याही प्रसिद्धीशिवायही ते ज्यांच्यापर्यंत पोहोचायचे आहे, ते पोहोचत आहे,” अशा संघाबद्दलच्या भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121