मोदींचं ठाकरेंना ओपन चॅलेंज! सावरकरांबद्दल ५ वाक्य राहुल गांधींकडून वदवून घ्या!

    15-May-2024
Total Views |
 
Modi & Thackeray
 
मुंबई : नकली शिवसेनेने राहुल गांधींकडून सावरकरांबद्दल ५ वाक्य वदवून घ्यावी, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. गुरुवार, १५ नोव्हेंबर रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "काँग्रेसची मानसिकता कायम तुष्टीकरणाची राहिली आहे. परंतू, बाळासाहेबांबद्दल बोलणारेही काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. काँग्रेस आतंकवाद्यांचे समर्थन करते आणि नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. काँग्रेसचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. काँग्रेसच्या युवराजाने व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर केला होता. तेव्हाचे फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्राला चीड आली होती. परंतू, नकली शिवसेनेने तोंडाला कुलूप लावले आणि डोळ्यावर पट्टी बांधली," असा घणाघात त्यांनी केला.
 
 
राहुल गांधींबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, " काँग्रेसचे युवराज महाराष्ट्रात वीर सावरकरांचाही अपमान करतात. पण त्यांचा विरोध करण्याची नकली शिवसेनेची हिंमत होत नाही. इंडी आघाडीच्या लोकांनी युवराजांच्या तोंडून पाच वाक्य वीर सावकरांबद्दल वदवून दाखवा, असं माझं त्यांना आव्हान आहे. इंडी आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी राहुल गांधींना सांगितलं की, तुम्ही सावकरांवर बोलणं बंद करा. तेव्हापासून त्यांनी बोलणं बंद केलं. परंतू, नकली शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने हिंमत असेल तर राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांच्या महानतेबद्दल पाच वाक्य वदवून दाखवावी," असं खुलं चॅलेंज पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.