संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरी कलेचा समांतर प्रवास

    30-Apr-2024   
Total Views |
 
े्ि्
 
दि. १ मे १९६० या दिवशी मराठीला एक स्वतंत्र ओळख मिळाली. तोवर मराठीचा वापर, तिचा उपयोग व्यवहारात होता, परंतु भाषेला म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. भाषेला जेव्हा सत्तेची जोड असते, तेव्हा तिचा पैस, तिचा विस्तार चौखूर उधळतो. शिवकालापासून ते पेशवाईपर्यंत मराठीने हिंदुस्थानावर राज्य केले. होळकर, शिंदे, पवार अशा नावांच्या आधाराने तिने धार, इंदूर, माळवा, दिल्लीपर्यंत मजल मारली. त्यानंतर फंदफितुरी, लाचारी बळावली आणि फिरंगी भाषेचा कराल मेघ हिंदुस्थान ग्रासून राहिला. स्वातंत्र्य मिळवलं. आता सत्तेची परिभाषा बदलली होती. भाषा केवळ व्यवहारात वापरली जाणे पुरेसे नाही, तिला आर्थिक सुबत्तेचा भक्कम आधार लागतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली, त्यावेळी साहित्य आणि कला हातात हात घालून लोकाभिमुख झाल्या. हा मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरी कलेचा उलगडलेला हा समांतर प्रवास... 
 
आपल्या संस्कृतीचे सिंहावलोकन करताना आपल्या समाजव्यवस्थेकडे लक्ष जाते. भारतात नृत्य सादरीकरण, संगीत, पोवाडे, लावण्या या सर्व कला महाल, गढीच्या चार भिंतींमध्ये सादर होत होत्या. लोककलावंत तमाशा, वगनाट्यांचे फड काय तेवढे चैत्री जत्रांत लावत होते. शाहिरी काव्य यावेळी महाल सोडून रस्त्यावर आले आणि मराठी बहराला आली. मुळात शाहिरी काव्य म्हणजे काय, याची मीमांसा केली तर त्याचा स्पष्ट उद्देश ध्यानात येतो. शिवकालापासून ज्या उद्दिष्टाने तिला जगवलं ते उद्दिष्ट मागे सोडून शाहिरी काव्य लोकप्रबोधनासाठी लोकाभिमुख झाले आणि नव्या थाटाचे झाले. शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या, एखाद्या पुरुषाचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र आले असेल, तर त्याचे वर्णन सांगण्यासाठी पोवाडे, कवने केली जायची. याउलट, स्त्री-पुरुष संबंध, त्यांच्यातील कौटुंबिक संवाद, सौंदर्य हे सर्व लावणीत येतं. तसेच पुराणांतील कथा, आध्यात्मिक वा व्यावहारिक उपदेश, अध्यात्म वा पुराणकथा वा लौकिक जीवन यावरील कोडी, लोककथा हे लावण्यांचे विषय होत. या वाङ्मयाला थोडक्यात ‘शाहिरी काव्य’ म्हणतात.
 
‘शाहीर’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘शायर’ या मूळ अरबी शब्दापासून झाली. काव्यकवनं मुळात अर्थार्जनासाठी केली जायची. राजा, सत्ताधीशांसमोर त्यांची स्तुतीकवने गाऊन द्रव्यसंपादन हा त्याचा मुख्य उद्देश. आपल्याला माहितीये, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरांचे योगदान अग्रस्थानी आहे. यावेळी काय झाले की, अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला. आत्मभान जागृत झाले आणि बंडखोरी करून ही सर्व कलावंत मंडळी समाज प्रबोधनाच्या ध्यासाने रस्त्यांवर उतरली. हा काळच बंडखोरीचा होता. हे अभिसरण केवळ महाराष्ट्रात झाले असे नाही, तर अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी चळवळ, स्त्रीमुक्तीसाठी पाश्चिमात्य राष्ट्रात झालेली चळवळ, अमेरिका-व्हिएतनाम युद्ध, या सर्वांचे दशक हेच. या सर्व चळवळीत तरुणवर्ग उसळी मारून उतरला होता. त्याचे प्रतिबिंब इथेही पडले एवढेच! जे काही आहे ते केवळ धनिक, उच्चभ्रू यांच्यासाठीच आणि सामान्य माणूस मात्र अज्ञानाने ग्रासलेला, अशी परिस्थिती होती. ही अभिजन संस्कृती नको, तिचा धिक्कार करतो, असे म्हणत समांतर लोकसंस्कृती उदयाला येऊ लागली. हातात मिळेल ते डफ, ढोलकी घेऊन आम्ही आमचे संगीत निर्माण करू, अशी भूमिका घेणारे हे शाहीर गावोगाव वणवण फिरू लागले. खेळ करू लागले.
 
लोकजागृती करू लागले. मनोरंजनाच्या माध्यमातून लोकशिक्षणाचा वसा त्यांनी हाती घेतला. तसेच तेथील संस्कृती आपल्यात मुरवून घेऊ लागले. याचवेळेस बंगालमध्ये बादल सरकारांनी पथनाट्ये सुरू केली होती. आपल्याकडील नियतकालिकांच्या, ‘दलित पँथर’ वगैरे चळवळीतून या नवसंस्कृतीचे प्रतिबिंब पडणे अपरिहार्य होते. सार्वजनिक इमारतींच्या भिंती प्रक्षुब्ध करणार्‍या चित्ररेघांनी रंगू लागल्या, त्या याच काळात. यावेळी आपल्याकडे काय होत होते? आणीबाणी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा मृत्यू, अयोध्या यात्रा, बाबरी ढाँचाचे पतन, त्यातून उसळलेले दंगे, मंडळ आयोग, बॉम्बस्फोट या सर्वांचा परिणाम राजकीय अस्थिरतेवर आणि ही एवढी उलथापालथ कवितेतून, उमटत होती. मराठीतही येत होती. अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आणि अण्णा भाऊ साठे, अमर शेख, शाहीर साबळे, शाहीर दत्त गवाणकर वर्तमानाच्या पटलावर आपला शाहिरी बाणा निःसंदिग्धपणे कोरू लागले. त्याचवेळी चित्रपट क्षेत्र वेगाने पुढे सरकत होती. ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रतिभावंत चित्रपट क्षेत्रात शाहिरी करत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा त्यांच्या वेगळ्या परिने निरुपणे करीत लोकांपर्यंत पोहोचत होते. म्हणूनच त्यांना ‘आधुनिक संत’ अशी मान्यता मिळाली.
 
संयुक्त चळवळीनंतर अण्णा भाऊ साठेंची ‘माझी मैना’ चांगलीच गाजली. ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड आहे. साधारण लावणीकडे झुकेल अशीच. म्हटलं तर हे विरहगीत आहे, म्हटले तर राजकीय परिस्थितीवर केलेला प्रहार. संयुक्त महाराष्ट्र तर झाला पण बेळगाव, कारवार, निपाणी काही महाराष्ट्रात आले नाहीत. सांगलीतून ते पायी मुंबईत आले. हाताला लागेल ते काम केले आणि पोटाला दिसेल ते खाल्लं. कामगार चळवळीच्या वेळी त्यांची साहित्यिक कारकीर्द आकाराला आली. शाहीर अमर शेख एका गरीब कुटुंबातले. उद्ध्वस्त घर, पण आई मुनेरबी यांच्याकडून मराठी लोककलेचा वारसा त्यांना मिळाला. कधी गिरणी कामगार, कधी बसचालकासोबत क्लीनर म्हणून त्यांनी काम केलं. पुढे महाराष्ट्र चळवळीने त्यांना ओळख मिळवून दिली.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या दशकानंतर शाहिरी काव्याचे काय झाले?
 
या चळवळीनंतरही हे शाहीर सक्रिय होतेच. १९७२चा जीवघेणा दुष्काळ, जातीयवाद बोकाळल्याने जनमानसात पसरलेले द्वेषाचे वातावरण. मोजके शाहीर साहित्यनिर्मिती करत असल्याने एवढ्या मोठ्या अभिसरणाचे सार त्यातून कवडशांनी पडत होते. या साहित्यात वेदना होती, विखार होता, बंड होतं. विद्रोह होता. तशीच भूक होती आणि आत्मविश्वासही होता. हव्यासाचे प्रकटीकरण होते. या काळात ब्रिटिश संस्कृतीचा एवढा प्रभाव आपल्यावर होता की, सर्वच बाबतीत आपण त्यांचे अनुकरण करू लागलो होतो. साहित्य ही एवढी एकच गोष्ट होती, जी अस्सल आपली होती. कारण, तिची जननीच आपली समाजव्यवस्था होती. दुःख, दैन्य, अन्याय हे सर्व आपण सोसलं होतं, या अस्सलतेचा सन्मान करणारा रसिकही आपल्याकडे होता. कलेवर बाह्य संस्कृतीचा काहीअंशी प्रभाव असतोच, पण या अस्सल भावना जेव्हा आपल्या रक्तातून उसळून येत होत्या, तेव्हा तिची प्रगल्भता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. बावनकशी साहित्य हा मराठीचा अतुलनीय दागिना होता.
 
शाहिरी काव्य आज नव्या कलाप्रकारांच्या धबडग्यात लपले गेले तरी लोप पावलेले नाही. कलेतील क्रांती साहित्यात उमटल्यास नवल नाही. बंधने झुगारून देण्याचा काळ. काव्यानेही बंधने झुगारली. वृत्तात, तालात बांधलेली काव्यं मुक्तछंदात आली. विषयांचे बंधनही कवितेने मध्येच केव्हा तरी सोडून दिले. शाहिरी काव्याची कविता झाली. निसर्ग, धर्म, प्रेम, समाज याकडून कविता आत्मनिवेदनपर झाली. पाठकांची ’खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ कविता आणि आजची संदीप खरे, सलील कुलकर्णी जोडगोळीची गीते ऐकली की, हा कवितेचा जो प्रवास झाला, त्याकडे तुम्ही कसे पाहता? या प्रवासात ढसाळ, सुर्वे, करंदीकर, पाडगावकर, कुसुमाग्रज, ग्रेस, मर्ढेकर तसेच महिलांमध्ये शांताबाई, पद्मा गोळे, इंदिरा संत यापासून अरुणा ढेरे यांची कविता काही वेगळे सांगत असते. केवळ कविता हा साहित्यप्रकार जरी पाहायचा म्हटले, तरीही गेल्या ६० वर्षांतला तिचा पैस किती विस्तृत आहे! पण, तरीही तिच्या आजवर रसरशीत असण्याला मराठीला १९६० नंतर मिळालेली स्वतंत्र प्रतिष्ठेची ओळख कारणीभूत आहे. या सुवर्ण इतिहासाचा साज सावरण्याची जबाबदारी आता तिच्या भविष्यावर आहे. म्हणूनच, तिच्या उज्ज्वल भवितव्याची अपेक्षा आहे...

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.