"नाराज असलं म्हणून काय झालं? मी..."; अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

    30-Mar-2024
Total Views |
 
Ambadas Danve
 
मुंबई : नाराज असलं म्हणून काय झालं? मी ३० वर्षे जूना शिवसेनेचा शिवसैनिक असून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या माझी मानहानी करणाऱ्या आहेत, असे स्पष्टीकरण उबाठा गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.
 
अंबादास दानवेंना लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या पुढे आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
 
अंबादास दानवे म्हणाले की, "माझ्या पक्षप्रवेशाबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काही चॅनेल्सवर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मी ३० वर्षे जूना बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा शिवसेनेचा शिवसैनिक आहे. पदं येतात आणि जातात. मी गटप्रमुखापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार महत्त्वाचं नाही. पण अशा प्रकारच्या बातम्या माझी मानहानी करणाऱ्या आहेत."
 
आपल्या नाराजीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही लोकं फार खुश असतात का? ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होते फक्त त्याच दिवशी नाराजी असते. संभाजीनगर जिल्हा छोटासा असून मी प्रचारात उतरलो आहे. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा असल्याने आठ दिवसांत प्रचार पूर्ण होईल," असे त्यांनी सांगितले.
 
उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात रंगल्या होत्या. याबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, "चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनीही तिकीट मागितलं आणि मीसुद्धा तिकीट मागितलं होतं. ते आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजीनगर जिल्ह्यात काम करत आहे," असेही ते म्हणाले.