जरांगेंचा बारसकरांवर गंभीर आरोप! म्हणाले, "माझ्यावर आरोप करण्यासाठी त्याला..."
22-Feb-2024
Total Views | 125
जालना : माझ्यावर आरोप करण्यासाठी अजय महाराज बारस्करांनी ४० लाख रुपये घेतल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मराठा आंदोलनात मनोज जरांगेंना साथ देणारे किर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी बुधवारी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता जरांगेंनी त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, "अजय बारसकरांना हे बोलण्यासाठी ४० लाख रुपये मिळाले आहेत. म्हणूनच ते एका दिवसात एवढ्या गाड्या घेऊन मुंबईला गेलेत. त्यांना एकाच दिवसात एवढे चॅनेल्स कसे उपलब्ध होतात? मी १९ वर्ष संघर्ष करतोय तरीही मला एवढे चॅनेल उपलब्ध झाले नाहीत. यांना एका दिवसात झालेत. त्यामुळे मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की, तुम्ही याला साथ दिली तर याच्यामुळे तुमच्या पक्षाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही," असे ते म्हणाले.
"अजय महाराज बारस्कर यांचे आरोप हा ट्रॅप आहे. आतापर्यंत सहा महिने मी गोड होतो. हा सगळा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असून यात मुख्यमंत्री शिंदेंचादेखील प्रवक्ता आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे समाजासोबत तुम्ही प्रामाणिक रहा. गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका," असेही ते म्हणाले आहेत.