"उद्धव ठाकरे रात्री २ वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील", रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
29-Nov-2024
Total Views |
शिर्डी : (Ramdas Kadam) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 'न भूतो न भविष्यति' असे अभूतपूर्व यश मिळवून राज्याच्या सत्तेची सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत. विधानसभेच्या पराभवानंतर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शाब्दिक वार केला आहे. "एक दिवस असा येईल की,उद्धव ठाकरे रात्री २ वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील" ,असे खळबळजनक वक्तव्य कदम यांनी केले आहे.
रामदास कदम यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब शिर्डीला साईदरबारी पोहोचत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी कदमांना हे वक्तव्य केले.
काय म्हणाले रामदास कदम ?
रामदास कदम म्हणाले, "मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील. हे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. ज्यांनी बाळासाहेबांशी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलं, त्या पापाचं प्रायश्चित उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल", अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.