माझ्या कारकिर्दीत मी समाधानी : एकनाथ शिंदे

    27-Nov-2024
Total Views |
Eknath Shinde

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा सुरु असताना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. "अडीच वर्षाच्या कारकिर्दीतल्या कामावर मला समाधान आहे. आम्ही जे निर्णय घेतले, जी कामं केली त्याबद्दल मी खूप खूश आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेणार, तो मला मान्य आहे." असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून गोंधळ निर्माण झाला आहे. नेमकं कोण होणार मुख्यमंत्री याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहे. भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद यापैकी एक पर्याय देत विचार करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली आहे.

निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण गाठीशी घेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली. कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, जेष्ठ, रुग्ण यांच्यासाठी काम केले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण केली. याविषयी माहिती देत एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊन नडणारे नाही, तर लढून काम करणारे आहोत असे सांगितले. महाराष्ट्रातल्या जनतेला आनंद देण्याचे काम सरकारने केले. नरेंद्र मोदी, अमित शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेणार, तो मला मान्य आहे असे सांगत मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रातून घेण्यात येईल असेही त्यांनी सूचित केले.