संत एकनाथ महाराजांच्या वंशजाचे शुभाशीर्वादा घेऊन एकनाथ शिंदे यांनी भरला अर्ज
वागळे इस्टेटमध्ये भव्य रॅली काढुन एकनाथ शिंदेंचे शक्तीप्रदर्शन
28-Oct-2024
Total Views |
ठाणे : ठाण्याच्या कोपरी - पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी शुभआशीर्वाद दिले. तसेच निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सोमवारी वागळे इस्टेट परिसरात भव्य रॅली काढून अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी - पाचपाखाडी मतदार संघातुन उमेदवारी दाखल करताना सोमवारी मोठे शक्ती प्रदर्शन केले. राज्यभरातून तसेच जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते सकाळपासूनच ठाण्याच्या दिशेने बस कार दुचाकीने एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्यात आल्याने काही काळ वाहतुक खोळंबली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जातीने मिरवणुकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबियांनी त्यांना ओवाळून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
वागळे इस्टेट, आयटीआय येथे मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश हेदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढत असुन त्यांनी देखील आजच उमेदवारी अर्ज दाखल केला.
उबाठाचे गड उध्वस्त होतील - एकनाथ शिंदे
महायुतीचा हा बालेकिल्ला आहे.कोपरी - पाचपाखाडीची जनता सुज्ञ आहे. इथल्या लाडकी बहिणींनी, लाडक्या भावांनी अन लाडक्या मतदारांनी ही निवडणुक हातात घेतली आहे. घरातील प्रत्येक जण प्रचारासाठी उतरणार आहे. उबाठाचे गड जसे लोकसभेत उद्धवस्त झाले त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही होईल. असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेना विक्रमी मताधिक्य मिळेल
ठाणे नेहमीच भगवे होते, भगवे आहे आणि भगवेच राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथुन आपले आधीचे विक्रम तोडुन प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना व्यक्त केला, वारसा हा विचाराने आणि कृतीने येतो. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदे समर्थपणे चालवत असल्याचेही ते म्हणाले.