आईचे आशीर्वाद घेऊन संजय केळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज
भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या हजारो कार्यकर्त्याची उपस्थिती
28-Oct-2024
Total Views |
ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आईचे आशिर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. सोमवारी दिपावलीच्या वसुबारसच्या शुभदिनी केळकर यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मा.केंद्रीय मंत्री कपील पाटील, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, महेश कदम आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक, नागरीक उपस्थित होते.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केळकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली असून, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार संजय केळकर यांच्याकडून सोमवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. नौपाडा येथील घंटाळी मंदिरात श्री. केळकर यांनी सपत्नीक सहकुटुंब देवीचे दर्शन घेऊन मातोश्रींचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात साग्रसंगीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली.संजय केळकर यांना पाठींबा दर्शविण्यासाठी मातृशक्तीसह प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. यावेळी श्री. केळकर यांचे चौकाचौकात जोरदार स्वागत करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताप्रमाणे विकसित ठाणे साकारण्यासाठी तिसऱ्यांदा ठाणेकरांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल. असा विश्वास यावेळीआ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.
संजय केळकर हॅटट्रीक करतील - देवेंद्र फडणवीस
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय केळकर हे ठाण्याचा सुसंस्कृत चेहरा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत श्री. केळकर तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रीक करतील. असा ठाम विश्वास भाजपचे शिर्षस्थ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.