पुणे : भारत गायन समाज संस्थेतर्फे दिला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार यावर्षी रत्नागिरीतील गायिका सौ. श्वेता जोगळेकर यांना बहाल करण्यात आला आहे. रोख रक्कम आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गायिका मधुवती दांडेकर यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०१३ मध्ये श्वेता जोगळेकर यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले. संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, संगीत प्रीतीसंगम, संगीत सौभद्र, संगीत ययाती, संगीत मानापमान, संगीत ताजमहाल या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या संगीत हौशी नाट्य स्पर्धेत त्यांनी दोन वेळा रौप्यपदक पटकावले आहे. २०१३-१४ मध्ये मुंबई नाट्य परिषदेचा गजानन खाडीलकर पुरस्कार, २०१९ मध्ये बालगंधर्व रसिक मंडळी, पुणे यांचा काकासाहेब खाडीलकर पुरस्कार आदी पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी आजवर दिलेल्या संगीत नाटक क्षेत्रातील योगदानामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.