ऐतिहासिक! स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतर जम्मू-काश्मीरमधील वाल्मिकी समाजाने पहिल्यांदाच केले मतदान

    01-Oct-2024
Total Views |

Valmiki Community Voting

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Valmiki Community Voting)
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मंगळवारी मतदान झाले. यावेळी तब्बल सात दशकं मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या वाल्मिकी समाजाच्या लोकांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला आहे. समाजातील लोकांनी यास ऐतिहासिक क्षण म्हटले आहे. या टप्प्यात ४० जागांसाठी मतदान झाले असून ४१५ उमेदवार रिंगणात आहेत.

हे वाचलंत का? : बॅप्स स्वामीनारायण मंदिरांवरील हल्ल्याचा 'एचएसएस'कडून तीव्र निषेध

मिळालेल्या माहितीनुसार एका वृत्तसंस्थेशी बोलताना वाल्मिकी समाजाचे मतदार घारू भाटी म्हणाले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच वयाच्या ४५ व्या वर्षी मतदान केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होणे हा त्यांच्यासाठी एकाअर्थी आनंदाचा क्षण आहे. अशी माहिती आहे की, घारू भाटी आपल्या समुदायाला नागरिकत्वाचा हक्क मिळवून देण्यासाठी १५ वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांना हा न्याय मिळाल्याचे घारू भाटी यांचे म्हणणे आहे. स्वच्छतेच्या कामासाठी येथे आणलेल्या वाल्मिकी समाजाला अनेक दशकांपासून मतदानाचा अधिकार आणि जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवल्याचे घारू भाटी यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पश्चिम पाकिस्तान आणि गोरखा समुदायातील निर्वासितांसह वाल्मिकी समाजाचे अंदाजे १.५ लाख लोक आहेत. ते जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यात विशेषतः सीमावर्ती भागात राहतात. गांधी नगर आणि डोग्गा हॉल भागात राहणाऱ्या समाजातील सुमारे १२ हजार लोक पूर्वी राज्य विषय प्रमाणपत्राअभावी मतदान करू शकले नाहीत.