मुंबई : देशातील वातावरण हे सध्या राममय झाले आहे. चहुबाजूंनी कानावर प्रभू श्रीरामाचा जयघोष, त्यांच्यावर आधारित भजने, गाणी ही ऐकायला मिळत आहेत. शिवाय रामायणावर आधारित मालिका, चित्रपट किंवा नाटिका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, ८०च्या दशकात आलेल्या रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र, करोना काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांना पाहता आली. १९८७ ते १९८८ या काळात प्रसारित झालेल्या या मालिकेमध्ये अभिनेते बाळ धुरी यांनी राजा दशरथाची भूमिका तर त्यांच्या खऱ्या जीवनातील पत्नी अभिनेत्री जयश्री गडकर यांनी कौसल्या ही भूमिका साकारली होती.
बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांच्या अभिनयाची कारकिर्द रंगभूमीवरुन सुरु झाली. बाळ धुरी यांचा जन्म १९४४ साली झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या बाळ यांनी नाटक आणि कालांतराने चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. बाळ धुरी अभिनयासोबत अभ्यासतही पारंगत होते. अगदी ५०-६० च्या दशकात त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी देखील त्यांना मिळाली होती पण त्यांना कलाविश्वात काम करण्याची ओढ होती. मात्र, त्यांच्या कुटुंबियांचा यासाठी विरोध झाल्यानंतरही बाळ धुरी यांनी विरोधाला न जुमानता नोकरी सोडून देवाचिये द्वारी मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
कालांतराने त्यांना रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत दशरथ राजाची भूमिका मिळाली आणि त्यानंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. दशरथ राजाची त्यांनी साकारलेली भूमिका पाहून घरच्यांचा राग देखील शमला. आणि त्यानंतर बाळ धुरी यांनी अनेक अजरामर भूमिका मराठी चित्रपटसृष्टीला दिल्या.