उत्तन : “लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतरचे षड्यंत्र रचले जात आहे. या वेढ्यात आपण अडकणार नाही, याची युवापिढीने आवश्यक खबरदारी घ्यावी,” असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. उत्तनच्या केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १२ सप्टेंबर रोजी काशीनाथपंत लिमये सभागृहात पार पडला. या स्वागत समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून साळवी उपस्थित होत्या.
त्यांनी जव्हार, वाडा, पालघर आणि डहाणूमधून उत्तन कृषी तंत्र विद्यालयामध्ये निवासी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थांशी संवाद साधला. योगिता साळवी म्हणाल्या की, “ ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतराचे षड्यंत्र काही समाजविघातक शक्ती करत आहेत. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवून, प्रेमाच्या जाळ्यात फसवून युवापिढीला निष्काम, बेकार करण्याचे कारस्थान ते रचत आहेत. युवापिढीने उज्ज्वल भविष्यासाठी, कल्याणासाठी आणि प्रगतीसाठीही अशा देशविद्रोही शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’चा धोका ओळखून युवापिढीने खास करून विद्यार्थीवर्गाने सावध राहायला हवे, असे“ त्या म्हणाल्या. या कार्यक्रमामध्ये केशवसृष्टी कृषीतंत्र विद्यालय आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ या अभियानाअंतर्गत योगिता साळवी यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. यावेळी योगिता साळवीयांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ड्रग्ज जिहाद'मध्ये युवा पिढी फसण्याच्या अनेक बाबींचा उहापोह केला. " 'लव्ह जिहाद' मध्ये फसण्याचे कारण काय? त्याचे दुष्परिणाम काय ? तसेच, 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून धर्मांतर झाल्यावर त्या व्यक्तीच्या व्यक्तिक, सामाजिक समस्या काय असतात? तसेच, जीवनामध्ये धर्म संस्कार आणि संस्कृती का महत्त्वाची ? माता पिता, कुटुंब, समाज आणि धर्म यांचा संबंध आणि यशस्वी आयुष्य यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले. युवा पिढीने धर्म संस्कार आणि संस्कृती जपली, तरच ते आयुष्यात प्रगती करत उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात," असे वक्तव्य साळवी यांनी केले.
योगिता साळवी यांनी आपल्या व्याख्यानात 'लव्ह जिहाद' आणि 'ड्रग्ज जिहाद'च्या च्या सत्य घटना सांगितल्या. 'लव्ह जिहाद', 'ड्रग्ज जिहाद'च्या जाळ्यात फसणार नाही, धर्म संस्कार मूल्य जपत उज्ज्वल भविष्य घडवू,“ अशी ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.
यावेळी ‘उत्तन कृषी संशोधन संस्थे’चे कार्यवाह प्रियदर्शन कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उत्तन कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य अनघा मांडवकर, कार्यक्रम प्रमुख अभय चौधरी, केशवसृष्टी कार्यालय प्रमुख निशा मरोलिया, शिक्षिका मनीषा जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष विद्यार्थी सिद्धार्थ पवार याने केले.