मुंबई : आज दि. १० मे ग्रेसांचा जन्मदिवस. ग्रेसांची कविता नेहमी समजत नाही असे म्हणताना सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी मुंबई तरुण भारताला दिलेल्या मुलाखतीत ग्रेसांच्या कवितेबाबत त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले आहेत.
कविता कशी असावी व उत्तम कवी कोण असा प्रश्न विचारला असता गुरु म्हणाले, "जी कविता सोप्या शब्दात असते व सगळ्यांना समजते ती कविता चांगली. कविता लोकांना आपल्या वाटल्या पाहिजेत. त्यांच्या भावनांशी त्या जुळायला हव्यात. सोप्या शब्दात तयार झालेली कविता उत्कृष्ट. केवळ जाड शब्द कवितेत येता कामा नयेत. मात्र ग्रेसांची कविता वेगळी आहे. ती सहज समजत नाही. पण आपण जेव्हा वेगळ्या मानसिकतेत असतो तेव्हा त्या संदर्भात लिहीलेली त्यांची कविता वाचली की लगेच आपल्याला आपलीशी वाटते. त्यामुळे ग्रेसांनी लिहिलेली कविता त्या विशिष्ट मनस्थितीत असल्यावरच समजते."
कवी ग्रेस म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे यांचा जन्म १० मे १९३७ साली झाला. त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धातच काव्य लेखनास सुरुवात केली. दुःखाचे सोहळे करणारे वेदनेचे महाकवी अशी त्यांना त्यांच्या गहन काव्याने ओळख करून दिली. ग्रेसांची काव्ये गूढ असतात व त्यांच्या ललित कथा आणि कविता ओढ लावतात.