अनादि मी अनंत मी अवध्य मी भला | मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||
27-Mar-2023
Total Views | 1193
451
स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिभाशक्ती अफाट होती. ते स्वातंत्र्यसैनिक होतेच परंतु त्याहीपेक्षा उत्तम कवी होते. त्यांची अनेक गाणी, कविता गाजल्या, परंतु या ओळींची तोड कशासही नाही. या २ ओळींतून त्यांनी आपली ओळख जगाला करून दिली, जी आजही तेवढीच खरी आहे. सावरकर हे कालसुसंगत आहेत. ते म्हणतात, मला सुरुवात नाही तसाच अंतही नाही. मी म्हणजे एक विचार आहे. जो कालातीत आहे. तो विचार कधीही संपुष्टात येत नाही. असंख्य शत्रू निर्माण होतील, परंतु हा विचार समूळ नष्ट करणं कुणाला शक्य आहे? सावरकरांचा विचार नष्ट करणारा शत्रू अजूनही जन्माला आला नाही. या एका ओळीत केवढे सामर्थ्य, केवढा अर्थ भरलेला आहे याची प्रचिती येते.
पूर्ण कविता अशी आहे,
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||ध्रु||
अट्टहास करित जाई धर्मधारणी
मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळा रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीने भिववु मजसी ये ||१||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी
हटुनी भवति रचिल शीत सुप्रभावती
आण तुझ्या तोफाना क्रूर सैन्य ते
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाहला त्रिनेत्र तो
मी तुम्हासी तैसाची गिळुनी जिरवितो ||२||
या कवितेचा सारांश -
मला सुरुवात नाही, अंत नाही. मला मारले जाऊ शकत नाही. मला मारणारा शत्रू अजून जन्माला आलेला नाही. मी हट्टाने युद्धक्षेत्रात प्रवेश करीन. मृत्यूशी लढण्यासाठी मी युद्धक्षेत्रात उतरेन. आग मला जाळू शकत नाही, तलवार मला कापू शकत नाही. भ्याड मृत्यू माझ्या नजरेपासून पळून जातो. आणि हा मूर्ख शत्रू मृत्यूच्या भीतीने मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे !
जर तू मला भयंकर सिंहाच्या पिंजऱ्यात ढकललेस तर तो गुलामासारखा माझा पराक्रम पाहील. जर तुम्ही मला अग्नीच्या ज्वाळांमध्ये फेकले तर त्या स्वतःहून दूर जातील आणि शीतल तेज मला घेरून राहील. तुझे तोफगोळे, तुझे भयंकर सैन्य, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान किंवा आग फेकणारी शस्त्रे घेऊन ये - जसे त्रिनेत्र म्हणजेच (भगवान शिवाने) प्राणघातक विष हलाहलाला गिळून टाकले, त्याचप्रमाणे मी तुला गिळून टाकीन आणि तुझा अहंकार चिरडून टाकीन.