नवी दिल्ली : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये शताब्दी कार्यविस्तार योजनेचा आढावा घेण्यात येणार असून २०२५ या शताब्दी वर्षासाठी योजनांवर चर्चा केली जाईल,” अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
हरियाणातील पानिपत जिल्ह्यात समालखा येथे रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. यावेळी सुनील आंबेकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले, “अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची सर्वात महत्त्वपूर्ण सभा आहे. या बैठकीत मागील वर्षातील कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षात संघामार्फत करावयाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातून संघाचे १४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये ३४ विविध संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे ११ मार्च रोजी अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये प्रतिनिधी सभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे १४ मार्च रोजी प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी मंजूर झालेल्या ठरावाची माहिती देतील,” असे आंबेकर यांनी सांगितले. प्रतिनिधी सभेस सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्व प्रदेश व प्रांतातील संघचालक व कार्यवाह उपस्थित राहणार आहेत. आंबेकर पुढे म्हणाले, की, “२०२५ साली रा. स्व. संघाच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण होणार आहे. प्रतिनिधी सभेत शताब्दी वर्ष कार्य विस्तार योजना २०२२-२३चा आढावा आणि अनुभवाच्या आधारे २०२३-२४चा कृती आराखडा तयार केला जाईल.”“आढावा घेण्याबरोबरच २०२५ पर्यंत संघात नवीन स्वयंसेवकांना जोडणे, २०२३-२४ या वर्षाचा कृती आराखडा तयार करणे यावर चर्चा करण्यात येणार आहे,” असेही आंबेकर यांनी यावेळी नमूद केले.