बोगद्यात ४० नव्हे तर ४१ मजूर अडकलेत! बचावकार्य सुरु

    18-Nov-2023
Total Views |

Uttarkashi


देहरादून :
उत्तरकाशीतील निर्माणाधीन बोगद्यात गेल्या सात दिवसांपासून अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरुच आहे. दरम्यान, यासाठी आणण्यात आलेल्या अमेरिकन मशीनने काम करणे बंद केल्याने बचावकार्याला ब्रेक लागला आहे. यातच बोगद्यात अडकलेल्या मजूरांची संख्या ४० नसून ४१ असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बोगद्यातून कर्कश आवाज ऐकू येत असल्याने बोगद्याचा आणखी काही भाग कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे शनिवारी बचावकार्य थांबवण्यात आले. दरम्यान, दोन पाईप एकत्र जोडताना सर्वाधिक वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यासोबतच अमेरिकन ऑगर मशीन बोगद्यात टाकत असताना होणाऱ्या कंपनामुळे त्याचा समलोल बिघडत आहे. त्यामुळे हे काम अधूनमधून थांबवण्यात येत आहे. दरम्यान, इंदूरहून जवळपास २२ टन वजनाची काही महत्त्वाची उपकरणे हवाई दलाच्या मदतीने देहरादूनला पाठवण्यात आली आहेत.
 
तसेच रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या ऑस्ट्रेलियन कन्सल्टन्सी कंपनीचे तज्ज्ञही बचाव कार्यात मदत करण्यासाठी उत्तरकाशीला पोहोचले आहेत. दुसरीकडे नॉर्वेकडूनही मदत मागवण्यात आली आहे. याशिवाय मजूरांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्याच्या बाहेर मंदिरदेखील तयार करण्यात आले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.