मुंबई : राजकीय दबावतंत्रातून अद्वय हिरेंना अटक करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना नाशिक ग्रामीण पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींवर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
संजय राऊत म्हणाले, "संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील प्रमुख नेते भाऊसाहेब हिरे यांचे अद्वय हिरे नातू आहेत. पण, अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. त्यांच्यावरील आरोप भाजपात असताना आणि त्याआधीही होते. पण, शिवसेनेत आल्यावर मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा घेतली आणि मतदारसंघ ढवळून काढला. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत. गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.