...आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मी पण समीर चौघुलेंचा चाहता आहे!

    13-Nov-2023
Total Views |

cm shinde 
 
मुंबई : करोना काळात सर्वदुर नकारात्मकतेचे वातावरण पसरलेले असताना सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने नागरिकांचे मनोरंजन करत त्यांना जगण्याची नवी उर्जा दिली होती. आणि याच हास्यजत्रा कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चाहते असल्याची कबूली त्यांनी स्वत: दिली. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमालॉ मालिका आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचं आणि कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक केले.
 
दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमादरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील कलाकार आणि अभिनेते समीर चौघुले गंमतीत म्हणाले की, “ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन माझे चाहते आहेत”. यावर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सुद्धा तुमचा चाहता आहे.” पुढे ते म्हणाले की, “घरचे लोक हास्यजत्रासारखे कार्यक्रम पाहत असतात, बऱ्याचदा तणावात असतो तेव्हा मीसुद्धा हा कार्यक्रम पाहतो. कधी अचानक घरी आलो आणि हास्यजत्रा कार्यक्रम चालू असतो तेव्हा थोडा वेळ का होईना मी तो कार्यक्रम पाहतो. राज्यकारभार करत असताना कधी काय होईल, कधी कोण काय बोलेल, त्यामुळे आम्ही सगळे व्हेंटीलेटरवर असतो. आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कधी तरी असे कार्यक्रम पाहतो”.
 
करोना काळातील आठवणी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “करोनाच्या काळात डॉक्टर, पोलीस यांच्यासह कलाकारांनीही त्यांचं कर्तव्य बजावलं. सर्वजण एकमेकांची मदत करत होते. त्या काळात समीर चौघुले आणि इतर कलाकारांनी जे काम केलं, त्याचं कौतुक करायला हवं. प्रत्येकाने आपली कर्तव्याची बाजू उत्कृष्टपणे निभावली. त्यानंतर आपलं सरकार आलं आणि करोना पळून गेला. शेवटी करोनालाही जावं लागलं. तो किती दिवस आपल्याला त्रास देणार, किती दिवस आपल्याला घरात बसवून ठेवणार”.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.