‘अर्थ’पूर्ण संकल्प

    19-Jan-2023
Total Views |
 निर्मला सीतारामनइंग्रजी नव्या वर्षाच्या आगमनासोबतच अर्थक्षेत्रातही हालचाली वाढू लागतात. निमित्त असते, अंदाजपत्रकाचे. केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय दडले असेल, अर्थमंत्री आपल्या पोतडीतून काय काढतील, याची उत्सुकता सर्वसामान्यांसह उच्चभू्र मंडळींनादेखील असते. अर्थसंकल्पाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम देशातील सर्वच घटकांवर होत असतो. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता ही क्रमप्राप्तच. यंदाच्या अर्थसंकल्पालाही अनेक बाबींचे वलय आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतर प्रथमच पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तसेच मोदी यांच्या या दुसर्‍या कार्यकाळातील हा निवडणुकांपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे ते या अर्थसंकल्पातून जनतेला काय दिलासा देतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहेच. आर्थिक बाबतीत भारत ज्या मोठ्या राष्ट्रांच्या रांगेत आहे, त्या राष्ट्रांची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. अमेरिकेचे कोरोनामुळे मोडलेले कंबर असो किंवा चीनमध्ये कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक. तिकडे इंग्लंडची अर्थव्यवस्थाही डबघाईला आलेली, तर फ्रान्स आणि जर्मनी हे दोन देश भारताच्या पिछाडीवर आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती तुलनेने मजबूत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यामुळे यंदाच्या भारतीय अर्थसंकल्पाला जागतिक कोंदण असेल. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी ६.५ ते ७ टक्क्यांची ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पन्न) उद्दिष्ट निश्चित केले आहे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर १५ ते २० टक्के असण्याचे संकेत मिळाले आहेत. या दोन बाबींमुळे लघु उद्योगांना चालना देण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा निर्मला सीतारामन यांचा ‘अर्थ’पूर्ण संकल्प म्हणावा लागेल. बुधवार, दि. १ फेबु्रवारी रोजी त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. भारताने आता जागतिक अर्थव्यवस्थेचे केंद्र होण्याकडे सुरू केलेल्या वाटचालीचे प्रतिबिंब यंदाच्या अंदाजपत्रकातून दिसून येणार आहे. त्याचबरोबर जागतिक पटलावर उपलब्ध झालेल्या अनुकूल स्थितीत भारताने आता २०३५ पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. एकंदरीतच यंदाचा अर्थसंकल्प धाडसी असेल, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि पंतप्रधानांनी देशाला दिलेला विकासाचा मंत्र प्रत्यक्षात यशस्वी होणार आहे.


कौशल्याचे ‘अंदाज’


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे सांभाळल्यापासून कौशल्यावर आधारित नवोपक्रमांना सातत्याने प्राधान्य देण्यात आले. त्याचाच परिणाम देशाच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत लहान-मोठे उद्योगधंदे संकटात सापडलेले असताना यंदाच्या अर्थसंकल्पात कौशल्यावर आधारित उपक्रमांना चालना देण्याचे सूतोवाच अर्थतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. खासगी क्षेत्रातील उपक्रम या संधीचा नक्कीच लाभ घेतील. त्यासाठी संशोधन आणि विकास (आर अ‍ॅण्ड डी) यावर भर देण्यात आला. औषधनिर्माण क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या दोन वर्षांत या क्षेत्राकडून येणारा महसूल आठ टक्क्यांवरून ६.६ टक्के इतका कमी झाला. या बाबी अर्थ विभागाने गंभीरपणे घेतल्या असून, खासगी क्षेत्राला संशोधन स्तरावर अनुदान (सीएसआर) देण्याचा विचार केला जात आहे. त्याचाच प्रत्यय यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून येईल. कोरोना काळात औषध उत्पादन कंपन्यांमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. मात्र, त्यात सातत्य टिकवून ठेवण्यासाठी कौशल्यावर आधारित अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन या संदर्भात केंद्र सरकारने २०२० मध्ये तयार केलेल्या योजनेत अधिक संशोधन करून त्यास चालना देण्याची गरज आहे. त्याचबरोबर भारीत कराची पुनर्रचना व्हावी, असा सूर या क्षेत्रातील उद्योजकांचा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्रावर संशोधन करणार्‍या विद्यापीठांना ‘सीएसआर’ निधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. संशोधनात्मक कौशल्य विकासाला चालना देऊन, त्यातील सातत्य टिकविण्याासाठी केंद्राने ‘सीएसआर’चे क्षेत्र विस्तारण्याची गरज आहे. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी राखीव ठेवलेला निधी २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. अधिक निधीचा विनियम योग्य प्रकारे होणार नाही, एकतर तो पडून राहील. त्यासाठी तो कौशल्यपूर्ण संशोधनाकडे वळवावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. भारताकडे ‘जी २०’ देशांचे नेतृत्व आहे, या संधीचा लाभ घेऊन आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याची यंदाच्या अर्थसंकल्पात संधी मिळणार आहे, त्याचा आपण पुरेपूर लाभ घेतल्यास आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट आणि कौशल्यपूर्ण होईल, त्यासाठी नवोपक्रमांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.
-मदन बडगुजर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.