मुंबई : मुंबईचे हृदय अशी ओळख असणारे ‘आरे कॉलनी’. हिरवळीने आणि जैवविविधतेने समृद्ध असणारे ‘आरे’ म्हणजे सिमेंट-काँक्रिटच्या विळख्यात दिमाखात मुंबईत उभे असणारे जंगल. मात्र, याच ‘आरे’ वसाहतीमधील रस्त्यांची अवस्था मात्र बिकट आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणार्या या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे पाहायला मिळते.
गोरेगाव-पवईला जोडणार्या रस्त्याची दुरूस्ती गोरेगावच्या दिशेला मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. या रस्त्यावर मुंबई महापालिकेचे बॅरीगेट्सदेखील ठेवण्यात आले आहेत. पण, थोड्याफार प्रमाणात रस्तेदुरूस्ती केली की,पुरे असे काहीसे मुंबई महापालिकेला वाटत असावे. ‘आरे’ वसाहतीमधील जवळजवळ 80 टक्के रस्ते हे खड्ड्यांनी व्यापले आहेत. तसेच, मुंबई महापालिका येथे लक्ष पुरवत नसल्याचेही येथील स्थानिक अली यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले.
येथील खड्ड्यांमुळे आम्हाला मणक्यांची दुखणी सुरू झाली आहेत. मागे खड्ड्यांमुळे एका गरोदर महिलेचे बाळंतपणदेखील एका रिक्षात झाले आणि यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही. मात्र, मुंबई महापालिका जराही त्याबाबत गांभीर्याने लक्ष पुरवत नाही. पालिकेने रस्ता नीट करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु, आम्हाला वगळले आहे का? अशी भीती आम्हाला आता जाणवू लागली आहे, अशी व्यथा येथील स्थानिक नागरिकांनी मांडली. तसेच, आताच्या फडणवीस-शिंदे सरकारवर आमचा पूर्ण विश्वास असून ते ‘आरे’साठी योग्य ती पावले उचलतील, असा विश्वासही स्थानिकांनी यावेळी व्यक्त केला.
लवकरच दुरूस्तीच्या कामाला सुरुवात
‘आरे’तील अंतर्गत जे रस्ते आहे आहेत ते डेअरीच्या अखत्यारीत येतात. त्यात मुंबई महापालिका काही करू शकत नाही. पालिकेच्या अंतर्गत येणारा गोरेगाव ते पवई चेकनाक्यापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी सुरू आहे. तसेच, त्याठिकाणी पूल बांधण्यात येणार असून, त्यामुळे आरेतील व्याघ्र जे रस्त्यावर येतात, ते पुलाखालून जातील. त्यासाठी ‘एनओसी’ मिळण्यासही थोडा विलंब झाला. त्याचप्रमाणे आरेतील जे अंतर्गत रस्ते खराब झाले असतील, त्याचीही डागडुजी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. मध्यंतरी डेअरी परिसरातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे पुन्हा येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पाऊस कमी झाल्यावर रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात येईल.
- रेखा रामवंशी, माजी नगरसेविका, शिवसेना