रवी परांजपे एक कला विद्यापीठ

    17-Jun-2022
Total Views |

ravi paranjpe
 
 
या सप्ताहात दृश्य कलाकारांच्या बाबतीतील एक दु:खद घटना ऐकायला मिळाली. हा लेख लिहीत असतानाच नागपूरहून दु:खद वृत्त आले. राज्याचे माजी कलासंचालक प्रा. हेमंत नागदीव यांचे कर्करोगाने निधन झाले. याच सप्ताहाच्या सुरुवातीला पुण्यात स्थानिक असलेले जगप्रसिद्ध चित्रकार रेखांकनकार, लेखक, साहित्यिक, समीक्षक रवी परांजपे यांचे त्याच्या ८७व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही दिग्गजांना प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करून चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाप्रवासाचा आलेख उलगडून पाहूया!!
 
 
८ ऑक्टोबर, १९३५ रोजी जन्मलेल्या रवी परांजपे यांचे जन्मापासून शालेय जीवन हे बेळगावातच गेले. वडील कृ. रा. परांजपे हे त्यांचे प्रथम गुरू. त्यांची ओळख मोठी होती. थोर अभ्यासक, संशोधनपर सूक्ष्म लेखन करण्याचा व्यासंग आणि विविध कलाप्रकारांमध्ये अनेक प्रयोग करुन कलेतही एक वेगळा ठसा उमटवलेले, असे त्याचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या मातोश्रींकडेही अद्भुत कलागुण होते, अशा समृद्ध कलागुणांची पार्श्वभूमी लाभलेल्या रवी परांजपे यांना तेथीलच ‘सेंट पॉल्स हायस्कूल’मध्ये कलाशिक्षक म्हणून काम करणारे ज्येष्ठ चित्रकार के. बी. कुलकर्णी यांनी ‘ड्रॉईंग टीचर’ म्हणून आमंत्रित केले. तेथे सकाळी ‘ड्रॉईंग टीचर’ म्हणून नोकरी आणि दुपारनंतर के. बी. कुलकर्णी यांच्या ‘चित्रमंदिर’मध्ये त्यांनी उच्चकलेचे शिक्षण घेतले. पुढील कलाशिक्षणासाठी ते मुंबईतील त्यावेळच्या सुप्रसिद्ध ‘सर. जे. जे. स्कूल’मध्ये दाखल झाले.
 
 
कुठलाही संदर्भ न घेता प्रसंगानुसारी रेखांकने करण्याची त्यांची शैली, त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची आणि तीव्र स्मरणशक्तीसह उत्कट निरीक्षणशक्तीची साक्ष ठरलेली आहे. स्वदेशाभिमान आणि राष्ट्रवाद अंगी बाणलेला असल्यामुळे सौंदर्यसृष्टीचा व्यापक वापर राष्ट्रनिर्माणास कशाप्रकारे हातभार देऊ शकतो, यावर त्यांनी चिंतनासह संदर्भीय लिखाण केले. आज त्यांच्या कलाकृतीसह त्यांची लेखने आणि पुस्तके पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील.
 
 
साधारण १९५८ ते १९६८ या काळात मुंबईत विविध ठिकाणी चित्रकार रवी परांजपे यांनी कामे केली. ‘रतनबात्रा’ या सुप्रसिद्ध जाहिरात संस्थेत त्यांनी ‘आर्टिस्ट’ म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाची व्याप्ती आणि काम देण्याबाबतचा वक्तशीरपणा यामुळे त्यांना ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या कला विभागाचे ‘आर्टडायरेक्टर’ रमेश संझगिरी यांनी खास बोलवून घेतले. त्या दिवसापासूनच ‘टाईम्स’ वृत्त समूहाच्या प्रकाशकांसाठी कामे करणे सुरू केले. ‘कॅनव्हास’वर चित्र साकारण्याअगोदर त्यांच्या मनात त्या कलाकृतीची कल्पनाकृती निर्माण होत असावी. कारण, अंतर्मुख होऊन ते जेव्हा ‘कॅनव्हास’कडे एकरूप होऊन पाहायचे, कदाचित त्याचवेळी त्यांच्या मनःपटलावर कलाकृती निर्माण झालेली असायची. मग रंग-आकार-आकारांतील सौंदर्य आणि आकर्षक रचनाक्रम यांचे संस्कार सुरू होत. आवर्तनामागून आवर्तने झाल्यानंतर एक सुंदर कलाकृती जन्माला यायची. त्यांच्या रेखांटनातील आत्मविश्वास, चित्रघटकांतील एकमेकांचे पूरक नाते, छायाप्रकाशाचा खेळ, सावली (शॅडो) मुळे चित्रविषयाला प्राप्त होणारी ‘डेप्थ’ किंवा खोली, ‘अ‍ॅनॉटॉमी’चा अत्यंत सूक्ष्म अभ्यास, प्रभावी चित्रघटक आणि वातावरणातील गोडवा या सार्‍या गोष्टींचा मिलाफ म्हणजे परांजपे सरांचे ‘कलासृजन’!
 
 
त्यांनी, त्यांना गवसलेल्या शैलीतून काही व्यक्तिचित्रणेदेखील साकारलेली आहेत. जगदीशचंद्र बोस, विनोबा भावे, पिकासो अशा महान व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या कुंचल्याने बद्ध केले आहे. सरांच्या रंगलेपनातील आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे तैलरंग, अ‍ॅक्रॅलिक रंग, जलरंग, रंगीत पेन्सिली ही रंगलेपन माध्यमे सरांच्या इच्छेनुसार आणि त्यांना अभिप्रेत असेल, अशा पद्धतीने पृष्ठभागावर व्यक्त व्हायची. म्हणजे अ‍ॅक्रॅलिक रंगाला जलरंगाच्या स्वभावाप्रमाणे पारदर्शक वा अपारदर्शक रितीने रंगविण्याचे कौशल्य सरांकडे होते. अशावेळी एखाद्या ठिकाणी रंगीत पेन्सिलीचादेखील ते खुबीने ‘रेंडरिंग’साठी वापर करायचे. ‘मिक्स मीडिया’ अर्थात रंगमाध्यमांचे मिश्रण करून एखादा जादुई परिणाम ते फार चपखलपणे मिळवित असत. शिस्त-सौंदर्य एकजीवपणा आणि समतोल साधणारी रचना ही त्यांच्या अगदी साध्या अन् छोट्याशा ‘स्केच’मध्येदेखील दिसणारी वैशिष्ट्ये होत.
 
 
जाहिरात माध्यमांद्वारे ‘विचार प्रसारण’ या कलेला त्यांनी प्राधान्य दिले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या कलाविभागाचे काम सोडले आणि पुढे ते ‘बेन्सन’ला गेले. ‘बेन्सन’ ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची जाहिरात संस्था असल्यामुळे चित्रकार रवी परांजपे यांचं काम जागतिक स्तरावर पोहोचलं. त्यांची ‘बोधचिन्ह’, ‘रेखांकने’, ‘कॅलेंडर्स’, ‘फोल्डर्स’, ‘कव्हर्स डिझाईन’, ‘चित्रांकने’, ‘पेंटिंग्ज’ही रसिकमान्य झालेली आहेत. पुढे १९७३ परांजपेंनी ‘बेन्सस’सोडून स्वतःचा ‘स्टुडिओ’ सुरु केला. स्वतंत्र स्वरुपाची कामे येऊ लागली. कलाकाम आणि जगभरातील कलाकारांची चित्रशैली यावर त्यांनी प्रचंड अभ्यास केला. टिपणं-नोंदी लिहिणं सुरू राहिलं. त्यातूनच दर्जेदार आणि अनमोल माहितीचा खजिना ठरावा, अशा पुस्तकांची निर्मिती झाली. ‘शिखरे रंग रेषांची’, ‘ब्रश माईलेज’सारखी पुस्तके कलारसिकमान्य आणि वाचकप्रिय झाली. चित्रकार, लेखक, कलासमीक्षक अशी ओळख निर्माण झालेल्या रवी परांजपे यांची न्यूजर्सी लंडन, न्यूयॉर्क अशा ठिकाणी प्रदर्शने झालेली आहेत.
 
 
त्यांनी बिल्डर्स व्यवसायासाठी बिल्डींग्जचे ‘कॅटलॉग डिझायनिंग’मध्ये भरीव काम केले. मुंबईतील नामवंत आर्किटेक्ट फिरोज कुडियनवाला यांनी परांजपे यांना जी जी कामे दिली, त्यातून त्यांनी ‘पर्स्पेक्टिव्ह रेंडरिंग’ हा स्वतंत्र कलाविषय निर्माण केला.
२००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यकला प्रदर्शनात त्यांचा ज्येष्ठ कलाकार म्हणून सन्मान केला आहे. ‘कॅग’कडूनही त्यांना ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाला. ‘दयावती मोदी पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित केलेले आहे. १९९८ मध्ये त्यांना ‘अमेरिकन आर्टिस्ट सोसायटी’तर्फे सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
‘रवी परांजपे फाऊंडेशन’ आणि ‘रवी परांजपे आर्ट गॅलरी’ त्यांनी सामाजिकतेच्या बांधिलकीतून निर्माण केल्या. वडिलांच्या नावे त्यांनी ‘कृ. रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार’ सुरू केलेला आहे. प्रचंड व्यासंग असलेल्या या कलापीठाचा कलाजगताला अभिमान आहे. दि. ११ जूनला वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली...!
 
 
 
 - प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.