धागेदोरे इस्तंबूलमधील स्फोटाचे

    19-Nov-2022
Total Views |
kurdish

गेल्या रविवारी तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल बॉम्बस्फोटाच्या धमाक्याने हादरली. त्यानंतर लगोलग झालेल्या अटकसत्रात एका कुर्दिश सीरियन महिलेचं नाव मुख्य संशयित म्हणून पुढे आलं. या महिलेचे ‘कुर्दिश वर्कर्स पार्टी’ (केपीके) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तुर्की सरकारचे म्हणणे आहे. ‘केपीके’ने मात्र आपला या बॉम्बस्फोटाशी काहीही संबंध नसल्याचे म्हंटले आहे. पण, कुर्द लोकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी तुर्की सरकारचे बाहू फुरफुरत आहेत. या अनुषंगाने कुर्द-तुर्क संबंधाचा, कुर्दांच्या अस्तित्वाच्या लढाईचा आणि या प्रांतातील राजकारणाचा घेतलेला हा परामर्श...



रविवार, दि. 13 सप्टेंबरची संध्याकाळ. इस्तंबूल शहरातील एका गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा ठार आणि 53 लोक जखमी झाले. तुर्कीचे अध्यक्ष रसीप तय्यब एर्दोगान यांनी या घटनेचा निषेध करून हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली होती. बॉम्बस्फोटाशी संबंधित छायाचित्र अथवा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली. लगोलग 21 जणांना ताब्यात घेतलं गेलं. अहलम अल्बाशीर नावाच्या एका कुर्दिश सीरियन महिलेचं नाव प्रमुख संशयित म्हणून पोलिसांनी जाहीर केलं. या महिलेचे ‘कुर्दिश वर्कर्स पार्टी’ (केपीके) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप केला जातोय.



’केपीके’ने मात्र या बॉम्बस्फोटात आपला काहीही सहभाग नसल्याचं जाहीर केलंय. इतर कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी अजूनपर्यंत तरी घेतलेली नाही. तुर्की सरकारकडून मात्र या घटनेचा बदला घेण्याची भाषा बोलली जाते आहे. तुर्कस्तानमध्ये आणि सीरिया देशाच्या कुर्दबहुल उत्तर भागात यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आजवरचा इतिहास पाहता, या भागात तुर्की सरकार आणि कुर्द लोकांमध्ये संघर्षाची ठिणगी कधीही पडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.

कोण आहेत हे कुर्द?


तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील आणि सीरिया देशाच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या भागात कुर्द जमातीच्या लोकांची मुख्य वस्ती. इथेच इराक आणि इराण देशांच्या सीमा येऊन भिडतात. त्यामुळे कुर्द लोकांचा प्रदेश तुर्कस्तान, सीरिया, इराण आणि इराक अशा चार देशांमध्ये विभागला गेलेला. खरंतर कुर्दांचा इतिहास फार जुना. आपल्या हिंदू अथवा चिनी संस्कृतीसारखा. पार मेसोपोटेमियम संस्कृतीशी नातं सांगणारा. अरबस्तानात राहात असले तरी कुर्द म्हणजे अरब नव्हेत. त्यांचा संबंध पर्शियन म्हणजे आजच्या इराणियन लोकांशी कदाचित जोडता येईल. कुर्दिश लोक पूर्वी बौद्ध धर्माचे उपासक होते अन् त्यांचा भारतातील मौर्य साम्राज्याशी, सम्राट अशोकाशी संपर्क होता असं मानलं जातं. सातव्या शतकात इस्लामच्या उदयानंतर कुर्द लोक बनले सुन्नी मुसलमान. कुर्दांमध्ये झालेल्या सामाजिक सुधारणांमुळे या समाजात स्त्रियांना तुलनेनं अधिक स्वातंत्र्य आणि अधिकार आहेत. आज राजकारणामध्ये अनेक स्त्रिया कुर्द समाजाचं नेतृत्व करतात. स्त्रियांना समान संधी देणारा ’पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’ नावाचा कुर्दांचा राजकीय पक्ष तुर्की राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडतोय.

तुर्कस्तानशी भांडण कशामुळे?


15व्या शतकापासून तुर्कस्तान आणि आजूबाजूच्या भागावर तुर्की सम्राटांचा एकछत्री अंमल सुरू झाला. ते ‘ऑटोमन साम्राज्य’ म्हणून ओळखलं जातं. पहिल्या महायुद्धात तुर्की सम्राट जर्मनीच्या बाजूने युद्धात सहभागी झालेले. महायुद्धातील पराभवानंतर तुर्की साम्राज्य ब्रिटन, फ्रान्स यासारख्या युरोपीय सत्तांनी आपापसात वाटून घेतलं. स्वतःच्या सोयीसाठी या साम्राज्याचे जे तुकडे झाले, त्यातून आजचे इराक, जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया हे देश आकाराला आले. कुर्दांना खरंतर वेगळा देश देण्याचं आश्वासन युरोपियनांनी दिलेलं. याउलट मात्र हा प्रांत सोडताना कुर्द जमातीचा प्रदेश वेगवेगळ्या देशात विभागला जाईल, अशी तजवीज करून ते गेले.



आपसात भांडणं लावून निघून जायची ही खास युरोपियन खेळी. भारताची फाळणी असो, पाक-अफगाण सीमा प्रश्न असो, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष असो, या सगळ्या समस्यांचे जनक ब्रिटिशचं. असो. वेगळी संस्कृती, वेगळी भाषा यामुळे कुर्द समाज त्या त्या देशातील बहुसंख्येशी एकरूप होऊ शकलेला नाही. स्वतंत्र देशाची त्यांची इच्छा आणि त्यासाठी करावा लागणार संघर्ष प्रदीर्घ काळ चालूच आहे.



ऑटोमन साम्राज्याच्या पाडावानंतर मुस्तफा केमाल पाशा (ज्यांना ’अतातुर्क’ म्हणून ओळखलं जातं) या नव्या नेत्याचा उदय झाला. अतातुर्क यांनी तुर्कीला ब्रिटिश जोखडातून मुक्त केलंच शिवाय तुर्की समाजात मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणांना पाठबळ दिलं. समाजातील धर्माचं महत्त्व कमी करून पाश्चिमात्त्य देशांप्रमाणे व्यवस्था निर्माण केली. कुर्द समाजाची वेगळ्या देशाच्या मागणी अतातुर्कांना मान्य नव्हती. तुर्की सरकारचा विरोध नंतर इतका वाढला की कुर्द भाषेत बोलणंदेखील जणू एक गुन्हा झाला. कुर्दांना ‘पहाडी तुर्क’ (माउंटन टर्क्स) म्हटलं जाई.



या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी 1978 मध्ये ’कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) ची स्थापना झाली. इराक, सीरिया, इराण या शेजारील देशांमध्येही कुर्दांवर अन्याय होत होता. सद्दाम हुसेन यांनी तर त्यांच्यावर रासायनिक अस्त्रांचा वापर केलेला. पण, जगातील एखाद्या प्रबळ देशाचा भक्कम पाठिंबा नसतानाही कुर्द लढत राहिले. इराक, सीरिया, इराण हे देश अनेक वर्षे हुकूमशाही राजवटीखाली राहिलेले; कुर्दांची साम्यवादी लोकशाहीकडे झुकणारी राजकीय निष्ठा त्यामुळेच या देशातील राज्यकर्त्यांना न मानवणारी!

kurdish 1

प्रतिमा उंचावण्याचं राजकारण


तुर्कस्तानातील आजची परिस्थिती याहून फार वेगळी नाही. तुर्कीचे सध्याचे अध्यक्ष रेसीप तय्यब एर्दोगान 2003 सालापासून देशातील सर्वांत ताकदवान पद हातात ठेवून आहेत. सुरुवातीची दहा वर्षे पंतप्रधान पद आणि त्यानंतर 2014 पासून अध्यक्षपदी ते विराजमान झालेत. अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी त्यांचे अधिकार अपरिमित वाढवून घेतले; इतके की आज त्यांची गणना हुकूमशहांमध्ये करता येईल. सत्ता हाती येण्यापूर्वी सुधारणावादी वाटणारे एर्दोगान, त्यानंतर मात्र अगदी उलट वागताना दिसू लागले. त्यांच्या काळापासून तुर्कस्तानात इस्लामिक कट्टरता वाढत चालली आहे.



दोन वर्षांपूर्वी सगळं जग कोरोनाशी लढत असताना या महाशयांनी ’हाईया सोफिया’ या जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालयाचं रूपांतर मशिदीत केलं. ही मूळची चर्चची इमारत. 15व्या शतकात चर्चची मशीद झाली. 20व्या शतकात अतातुर्क यांनी धर्मनिरपेक्ष विचारसरणीला धरून तिथं वस्तुसंग्रहालय बनवलं. एर्दोगान यांनी काळाचं चक्र उलट फिरवून परत त्याची मशीद केली. असो. जगभरातील मुसलमान लोकांचं पुढारीपण करण्याची इच्छा ते मनी बाळगून आहेत. काश्मीर प्रश्न, भारतातील मुसलमानांचे प्रश्न यावरून भारत विरोधी वातावरण तयार करण्यात हे आघाडीवर. यासाठी पाकिस्तान, मलेशिया यासारख्या देशांबरोबर केलेली युती. रोहिंग्या मुसलमानांसाठी हे धावत बांगलादेशला गेले होते. रोहिंग्यांसाठी यांनी काही केलं नाही, पण ते लोढणं बांगलादेशच्या गळ्यात घालून आले.



कुर्द मुसलमान असले तरी हे एर्दोगान मात्र त्यांच्या अगदी विरोधात कारण कुर्द विरोधामुळे राष्ट्रभावना चेतवत ठेवता येते. एर्दोगान यांचं हे दुसरं अस्त्रं. खरंतर 2011 नंतर इराक-सीरिया या अरब पट्ट्यात ‘इसिस’, ‘अल नुस्र’ यासारख्या भयंकर क्रूर आणि ताकदवर दहशतवादी गटांनी जम बसवलेला. अनेक देशांच्या फौजा या गटांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असताना कुर्द लोकांच्या संघटनेनं ‘इसिस’ला कडवी झुंज दिली. या भागातील ‘इसिस’चा जोर कमी होण्यात कुर्दांचा सिंहाचा वाटा आहे. इराकमध्ये कुर्दबहुल प्रांताला स्वायत्तता देण्यात आली आहे. उत्तर सीरियाचा खूप मोठा भाग कुर्द लोक सांभाळतात. हे लोण आपल्या देशात पसरेल, अशी एर्दोगान यांना भीती वाटत असावी. यासाठी काही तरी कारण काढून ते कुर्द लोकांवर हल्ले करण्याची संधी शोधत असतात. तीन वर्षांपूर्वी ‘इसिस’चा प्रभाव कमी होताच तुर्कीने उत्तर सीरियामधील कुर्द प्रदेशांवर अनेक हवाई हल्ले केलेले. तुर्की कुर्द संघर्षात आजवर हजारो लोकांचा बळी गेलाय.

खरा हल्ला की बनाव?


बॉम्बस्फोटाची घटना घडल्यावर थोड्याच वेळात एर्दोगान यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्वतः जाहीर केले. त्यानंतर अगदी आश्चर्यकारक वेगाने अटकसत्र राबवण्यात आले. स्फोटाशी संबंधित कोणतीही माहिती प्रस्तुत करायला ताबडतोब बंदी घालण्यात आली होती. असं असूनही मुख्य संशयित महिलेच्या घरी टाकलेला छापा आणि तिला केलेली अटक यांची व्हिडिओ सकट विस्तृत माहिती सरकारनेच प्रसिद्ध केली, हेही एक आश्चर्यच! अमेरिका कुर्द दहशतवाद्यांना मदत करते असा आरोप तुर्कीकडून सातत्याने केला जातो. आश्चर्य म्हणजे, संशयित महिलेच्या सरकारने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात तिच्या कपड्यांवर ‘न्यूयॉर्क’ अशी अक्षरं ठळकपणे छापलेली दिसतात. हा सगळा निव्वळ योगायोग समजावा की, तुर्की सरकारमधील कुणीतरी रचलेला बनाव, असं वाटून जातं. तुर्कस्तानमधील सद्य राजकीय परिस्थिती पाहता अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.



एर्दोगान गेली जवळपास 20 वर्षे सत्तेवर आहेत. पण, या काळात त्यांना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. आज तुर्कस्तानमध्ये महागाईचा दर 85 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे, म्हणजे आपल्या देशातील महागाईच्या दहापटीहूनही अधिक. अनेक कुटुंबाना आर्थिक ओढग्रस्तीचा सामना करावा लागतोय. ‘लिरा’ या राष्ट्रीय चलनाचे झपाट्याने अवमूल्यन झाले आहे. तीन वर्षांपूर्वी महत्त्वाच्या पाच शहरात झालेल्या स्थानिक निवडणुकात एर्दोगान यांच्या पक्षाचा पराभव झाला होता. त्यानंतर बराच काळ उलटूनही जनमत चाचण्यांमध्ये सध्या एर्दोगान चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. अतिरेकी देशाभिमान, धार्मिक कट्टरता यांना पाठबळ देण्याची राजकीय खेळी यशस्वीपणे एर्दोगान अनेक वर्षे खेळत आलेत. आज इस्तंबूल बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर परत अशी नामी संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. कारण, अध्यक्षपदाची पुढची निवडणूक जवळ येऊ लागली आहे.




-सचिन करमरकर 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.