परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय शाळा सुरु होणार नाहीत : अजित पवार

    दिनांक  23-Jun-2020 17:44:50
|

Ajit Pawar_1  H
 
मुंबई : सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशामध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अशामध्ये जूनचा महिना चालू झाला असताना देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत कधी जाण्यास मिळणार, असे प्रश्न पालकांकडून विचारण्यात येत आहे. तसेच शाळा आणि ऑनलाइन शिक्षण यामध्ये विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांमध्येही मोठा संभ्रम आहे. अशामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय शाळा सुरु होणार नसल्याचे एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
 
 
 
राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना शिक्षण विभागाकडून जुलै महिन्यात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. यामुळे पालक आणि शिक्षकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यामध्ये सरकारची काय भूमिका असणार आहे? असा प्रश्न विचारला त्यांना विचारला गेला. यावेळी “राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही. तसेच त्याची खात्री पटत नाही. तोपर्यंत शाळा सुरू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही.” अशी माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडू, असे आश्वासनही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.