सातार्‍यातील सात जणांची तब्लिगी जमातमध्ये हजेरी

    दिनांक  02-Apr-2020 18:09:17
|

navi mumbai_1  
सातारा : दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज भवनमध्ये झालेल्या तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील ७ मुस्लिम धर्मियांनी सहभाग घेतल्याची माहिती उजेडात आली असून जिल्हाभरात खळबळ माजली आहे. तब्लिगीमध्ये सातारा शहरातील दोघांनी हजेरी लावली होती तर कराडमधील पाच जणही या मेळाव्याला गेले होते. आता या सातही जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यांपैकी एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

इस्लामच्या प्रचार-प्रसारासाठी जगातील १५०पेक्षा अधिक देशांत सक्रिय असलेल्या तब्लिगी जमात या संघटनेने मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत दिल्लीतील मरकज भवनमध्ये धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते आणि नंतर देशात लॉकडाऊनचा निर्णय झाला. सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. असे असूनही मरकज भवनमध्ये या आदेशाला हरताळ फासला गेल्याचे ३१ मार्च रोजी उघड झाले. इथे तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात विदेशातील मुल्ला-मौलवींनी भाग घेतल्याचे समोर आले. उल्लेखनीय म्हणजे यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजले. तसेच याच कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील मुस्लिम धर्मियांनीही उपस्थिती लावली होती. त्यातच सातारा जिल्ह्यातील सात जण हजर होते. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात गेलेले मुस्लिम धर्मिय १० मार्च रोजी माघारी परतल्याची माहिती पुढे आली आहे. तरीही या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत असून त्यांच्या संपर्कात इतर कोणी आले आहे काय याचाही तपास केला जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.