उद्धवजी, एवढी लाचारी का? ; देवेंद्र फडणवीस

    दिनांक  13-Feb-2020 15:48:10

devendra fadanvis_1 
 
 
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढे लाचार का आहेत? राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला तुम्हाला चालतो का? असा खडा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी.”, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
 
 
 
पुढे ते म्हणाले की 'सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार?', असा सवालही फडणवीस यांनी विचारला. मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आला आहे. “छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारावा. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याच्या मालिकेचे सत्र सुरुच ठेवले आहे. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. मध्यप्रदेश सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण सन्मानाने महाराजांचे पुतळा बसवला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
 
“काँग्रेसची राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु आहे. शिवरायांचा पुतळा तोडला, सावरकरांना अपमानित केले. महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र शिदोरीमध्ये सावरकरांवर लेख लिहिला. सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. स्वातंत्रवीर नव्हे तर माफीवीर अशाप्रकारच्या लांच्छनास्पद लिखाण केले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमी लोकांमध्ये संताप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेची अतूट सेवा केली. मात्र काँग्रेसने सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. काँग्रेस पार्टी हे करत असेल आणि शिवसेना केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे सहन करत असेल तर महाराष्ट्राला याचे उत्तर द्यावे लागेल. काँग्रेसने हे पुस्तक मागे घ्यावे, सावरकरांची माफी मागावी. जर मागे घेतले नाही तर त्यावर महाराष्ट्रात बंदी घालावी. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.