गोदामाईने धारण केले रौद्ररूप

    04-Aug-2019
Total Views | 59



नाशिक : नाशिककरांची रविवारची सकाळच पावसाच्या कोसळणाऱ्या धारांनी उजाडली. गेल्या एक आठवड्यापासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात सतत पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील जोरदार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले आहे.

 

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदाघाटावरील दुतोंड्या मारुती पूर्णत: बुडाला असून गाडगे महाराज पुलावरून पाणी प्रवाही झाले आहे. देव मामलेदार मंदिराचा काही भाग हा पाण्याखाली बुडाला आहे. तसेच शहरातील सराफ बाजार, भांडी बाजार, नेहरू चौक, मेनरोड येथील भाग जलमय झाल्याचे पाहावयास मिळाले. सरकार वाड्याच्या तीन पायऱ्या पाण्यात गेल्या असून महापुराची शक्यता वर्तविली जात आहे. गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा ठराविक अंतराने वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. सुदैवाने मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात पाणी पश्चिम व उत्तर दरवजातून घुसले. परंतु, पाण्याचा निचरा झाल्याने यात्रेकरू भाविकांची गैरसोय झाली नाही. शेती पाण्याखाली असल्याने पिके सडली असून रोपे कोलमडून पडली आहेत.

 

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांनी आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केलेल्या पूरपरिस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आ. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, मेजर किशोरसिंग शेखावत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सर्व तहसीलदार व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले की, "काझीगढी व त्यासारख्या धोकादायक ठिकाणांवरून नागरिकांचे त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पूरपरिस्थितीमध्ये कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी प्रशासनामार्फत पूर्वतयारी करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात हजर राहावे," अशा सूचना केल्या.

 

असा करण्यात आला विविध धरणातून विसर्ग

 

गंगापूर : ४५,४८६ क्युसेक

दारणा : ४०,३४२ क्युसेक

नांदूरमध्यमेश्वर : २,००,००० क्युसेक

भावली : २,१५९ क्युसेक

आळंदी : १०,००० क्युसेक

पालखेड : ६३,९७० क्युसेक

होळकर पूल : ८२,००० क्युसेक

 
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात ३३० दिवसांत २४४२ हिंसाचाराच्या घटना

बांगलादेशात ३३० दिवसांत २४४२ हिंसाचाराच्या घटना

बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढल्याचे नुकतेच एका आकडेवारीवरून समोर आले आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी परिषद नावाच्या संघटनेने गुरुवारी सांगितले की, गेल्या ३३० दिवसांत म्हणजेच ४ ऑगस्ट २०२४ पासून देशात अल्पसंख्याकांविरोधात २,४४२ हिंसक घटना घडल्या. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेले. महिलांवर सामूहिक बलात्कारांसह अनेक लैंगिक अत्याचार झाले. प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. या हल्ल्यांत बळी पडलेल्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील पुरुष, महिला आणि किशोरवयीन मुलांचा समावेश ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121