पाकिस्तान-काँग्रेसी समदुःखी

    दिनांक  18-Aug-2019 19:51:03

 

जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्‍यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्‍यांचा, पाकिस्तानशी संधानबांधणार्‍यांचा हा भारत नाही, तर समस्येच्या मुळाशी हात घालणारा, घाव घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेही समदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!

 

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर विशिष्ट हेतूने कार्यरत प्रसारमाध्यमांनी तसेच पक्षनेत्यांनी विषारी प्रचाराला सुरुवात केली. आता जम्मू-काश्मीरमध्ये आगडोंब उसळेल आणि त्यात तिथली आहे ती शांतता, सौहार्द, सलोखा भस्मसात होईल, अशी दिवास्वप्नेही त्यांनी पाहिली. एक-दोन निवडकांच्या मुलाखती-प्रतिक्रिया घेऊन ती संपूर्ण राज्याची भावना म्हणून दाखवायचे, खोटी, भ्रामक, अर्धसत्य माहिती देत कालवा करायचा, ही खेळी त्यांनी अवलंबली. भारत सरकार आणि लष्कर जम्मू-काश्मीरची संस्कृती उद्ध्वस्त करणार, अशा हाकाट्याही या लोकांनी मिळेल त्या मंचावरून पिटल्या. मात्र, मोदी-शाहरूपी कुशल शल्यचिकित्सकांच्या जोडगोळीने केलेल्या या शस्त्रक्रियेच्या विरोधकांना अपेक्षित अशा प्रतिक्रिया खोर्‍यात उमटल्याच नाहीत.

 
 जसजसे राज्यातील संचारबंदी, इंटरनेट व अन्य संपर्क यंत्रणांवरील निर्बंध शिथील केले गेले, तसतसे तिथले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. राज्यातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, अन्य आस्थापने आणि जनतेची दैनंदिन कामेही सुरू झाली. हा विध्वंसाच्या, अघटिताच्या आशा-अपेक्षेने डोळे लावून बसलेल्या सर्वांना धक्काच म्हटला पाहिजे. यावरून होत असलेली त्यांची तडफड, फडफड अवघ्या देशाने आणि इथल्या राष्ट्रवादी जनतेनेही पाहिली. त्यावरून सोशल मीडिया व इतरत्रही या मंडळींना ट्रोल केले गेले, टीका-टिप्पणी करण्यात आली. परंतु, सीमेपलीकडच्यांनी अफवांचीच शेती करायला सांगितलेली असल्याने देशभक्तांच्या बोलण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. अर्थात पाकप्रेमाचाच अफू टाळूला लावलेल्यांनी आम्हीच खरे म्हणत, आपल्याव्यतिरिक्त इतरांवर अविश्वासच दाखवला. केंद्र सरकार, लष्कर, राज्यपाल आणि भारतीय प्रसारमाध्यमांवर खोटारडेपणाचे आरोपही त्यांनी केले. मात्र, सध्या काश्मिरी जनतेनेच या देशविघातकांना आपल्या कृतीतून चपराक लगावली आहे, जिचा आवाज वर्षानुवर्षे गुंजत राहिल.
 
 

 दुसर्‍या बाजूला जम्मू-काश्मीरविषयीच्या निर्णयाने पाकिस्तानची तर पहिल्या दिवसापासूनच आग आग चालू झाली. भारताचा अंतर्गत मुद्दा असलेल्या जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रयत्न पाकिस्तानने चालवले. मलेशिया, तुर्कस्तानसह अमेरिका, संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त राष्ट्रांत त्याने हा मुद्दा नेला. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या पाच वर्षांत आपल्या परदेश दौर्‍यांच्या साहाय्याने भारताची अशी काही प्रतिमा निर्माण केली की, प्रत्येकाने पाकिस्तानला नकारच दिला. नंतर पाकिस्तानचा एकमेव आधार असलेल्या चीनने हा विषय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चर्चेला आणला. आपला मसिहा ठरलेल्या चीनने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत चर्चेला नेल्याने पाकिस्तानला गगन ठेंगणे वाटून तो उड्या मारू लागला. पुढे चीनच्या विशेष विनंतीवरून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीरवर बंद दाराआड बातचीतही करण्यात आली. नंतर मात्र रशिया, फ्रान्स, अमेरिका आदी देशांनी साथ न दिल्याने चीनसह पाकिस्तानही तोंडावर आपटले.

 
 

सुरक्षा परिषदेतील चीन वगळता इतर देशांनी जम्मू-काश्मीरची समस्या आंतरराष्ट्रीय नसून द्विपक्षीय असल्याचे व ती दोन्ही देशांनीच सोडवणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. खरे म्हणजे, इथे दोन-तीन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे सदैव दहशतवादाची पाठराखण करणारा, त्याविरोधात कोणतीही कारवाई न करणारा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास जिंकण्यात सपशेल अपयशी ठरला. दोन, जम्मू-काश्मीर मुद्द्याच्या आंतरराष्ट्रीयीकरणाची पाकिस्तानची आणखी एक खेळी अयशस्वी ठरली. चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा विषय आणल्याने पाकिस्तानची अवस्था, आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, अशी झाली होती. परंतु, त्याचा अंमल पुढच्या घटनाक्रमाने आपोआप उतरला व हवेत गेलेल्या त्या देशाला स्वतःची योग्यता समजली. तीन, जगात पाकिस्तानला चीनव्यतिरिक्त कोणीही सोबती नाही, ही गोष्ट ठळकपणे अधोरेखित झाली. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन खुश झालेल्या इमरान खान यांना डोनाल्ड ट्रम्प यांनीही तंबी दिली, तर चौथी गोष्ट म्हणजे भारताने कलम ३७० व ३५ अ निष्प्रभ करतेवेळी, जम्मू-काश्मीरचे विभाजन व केंद्रशासित प्रदेश करतेवेळी आणि त्यानंतर हा विषय संयुक्त राष्ट्रात उपस्थित झाला, त्यावेळी परिपूर्ण गृहपाठ केल्याचे स्पष्ट झाले. सोबतच संयुक्त राष्ट्रांतून पाकिस्तानच्या पेकाटात बसलेली लाथ भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान किती मजबूत आहे, हेही सांगून गेली.

 
 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला लाथाडले तरी त्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तो आपला विजय म्हणूनच रंगवला. शाह मेहमूद कुरेशी या कोडग्या मंत्र्याने आपल्या देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी स्वतःचीच शेखी मिरवत तथ्यहीन बडबड केली. स्वतःचीच पाठ थोपटून घेताना या शहाण्याने मात्र एक खरी खरी माहिती उघड केली, त्याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत. “नरेंद्र मोदींनी जवाहरलाल नेहरूंच्या भारताची हत्या केली. आजचा भारत नेहरूंचा नव्हे तर मोदींचा आहे,” असे कुरेशी म्हणाले. अशाच अर्थाचे आणि आशयाचे शब्द आपल्या देशांतील काँग्रेसजनही वापरत असतात. म्हणजेच आता नेहरूंचा भारत राहिला नाही, ही या दोघांचीही सामायिक व्यथा असल्याचेच यातून समजते. बरोबरच आहे, कारण विद्यमान केंद्र सरकार ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ संकल्पाने भारलेले असून त्याच्या पूर्णत्वासाठी कार्यरत आहे. धर्मवेडेपणाच्या उन्मादाने भारलेल्या शेख अब्दुल्लांसारख्या नेत्यांशी हातमिळवणी करणारा हा भारत नाहीच, तर जो राष्ट्रवादाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर पुढे येईल, त्याला सोबत घेऊन जाणारा भारत आहे. टोळीवाल्यांच्या वेषात आलेल्या पाकिस्तानी सैन्याला कंठस्नान घालत जम्मू-काश्मीरचा एक एक इंच भाग माघारी घेऊ इच्छिणार्‍या सैनिकांना रोखणारा हा भारत नाही, तर आता समस्या उरली ती केवळ पाकव्याप्त काश्मीरची आणि तीही सोडवली जाईल, असे ठणकावणारा हा भारत आहे. एकतर्फी युद्धबंदी करून काश्मीर प्रश्न वर्षानुवर्षे सडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रात नेणार्‍यांचा हा भारत नाही, तर संयुक्त राष्ट्रांनाही यात दखल देऊ न देणारा आताच भारत आहे. जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्‍यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्‍यांचा, पाकिस्तानशी संधान बांधणार्‍यांचा हा भारत नाही, तर मुळाशी हात घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेहीसमदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!