शिल्पकलानिधी तज्ज्ञ कृष्णाजी विनायक वझे

    दिनांक  31-Mar-2019समाजात सहज वावरणाऱ्या काही व्यक्तींची प्रतिभा इतकी विराट असते की, तिचे कधी-कधी आकलनच होत नाही. शिल्पकलानिधी कृष्णाजी विनायक वझेंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. लोकांच्या अभ्युदयासाठी जन्म घेतलेल्या कृष्णाजींची १५० वी जन्म जयंती सन २०१९ मध्ये आहे. त्यांच्या ९० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण.


१६ डिसेंबर, १८६९ साली कोकणातील गरीब परंतु, वैदिक परंपरा लाभलेल्या कुटुंबात कृष्णाजी यांचा जन्म झाला. वडील वन खात्यात नोकरीला होते, तर आजोबा पट्शास्त्राध्यायी विद्वान होते. मौजीबंधनापूर्वीच परंपरेने आलेले संध्या-वैश्वदेवादी ब्रह्मकर्म त्यांनी शिकून घेतले. सातवी पर्यंत मराठी शिक्षण घेतल्यावर त्यांनी इंग्रजी शिक्षण घेऊ नये, असे घरच्या लोकांना वाटत होते. पण, सुप्रसिद्ध विद्वान ‘षड्दर्शन चिंतनिके’चे संपादक माधवराव कुंटे यांच्या आग्रहावरून कृष्णाजींचे इंग्रजी शिक्षण प्रारंभ झाले. पहिल्या तीन इयत्ता त्यांनी सव्वा वर्षांतच पार पाडल्या. तिसरीच्या परीक्षेला बसण्यापूर्वी त्यांनी असे म्हटले की, “मी वर्गात पहिला आलो तरच मला चौथी इयत्तेत बसवा; अन्यथा मी तिसरीतच अभ्यास करीन.” त्यांनी शब्द खरा करून दाखविला. वर्गात पहिला क्रमांक पटकावला. पुढे मॅट्रिकपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते इंजिनिअरिंगकडे वळले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी पुना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एल.सी.ई. या शाखेत प्रवेश घेतला आणि याच काळात पेशवाईतील शेवटचे वीर बापू गोखले यांच्या कुळातील काशीनाथपंत गोखले यांच्या कन्या द्वारकाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. सन १८९१ मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून पी.डब्ल्यू.डी. मुंबई येथे त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. परंतु, शिक्षण घेत असतानाच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, शिल्पकलेची परमावधी प्रकट करणाऱ्या सहस्त्रावधी वास्तू भारतात अस्तित्वात असतानासुद्धा शिक्षण घेतलेल्या इंजिनिअरिंगमध्ये भारतीय शिल्पशास्त्राचे कोठेही नाव नाही. सगळा भडिमार काय तो युरोपीयन ग्रंथांचाच. भारतात उभ्या राहिलेल्या वास्तूंच्या संबंधीचे ग्रंथ निश्चितच असले पाहिजेत आणि म्हणूनच त्यांनी प्राचीन ग्रंथांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला. एवढेच नव्हे तर काबूल, कंदहार, अफगाणिस्तानातील ग्रंथालयेसुद्धा पालथी घातली. तेथील अवशेष तंत्रज्ञानाचे निरीक्षण केले. नोकरी काळातील जवळजवळ २८ वर्षे त्यांनी हा ज्ञानाचा संग्रह करणे सुरू ठेवले होते. बारा बलुतेदारांकडे असलेली अनुभवजन्य माहिती-मापे-परिमाणे त्यांनी स्वत: त्यांच्याकडे जाऊन सखोलपणे मिळविली.

 

वरिष्ठ युरोपीयन अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणे कसे अवघड असते याची कल्पना आपण करूच शकत नाही. तरीही कृष्णाजींनी अविश्रांत परिश्रम आणि शुद्ध आचरणाच्या जोरावर देव-धर्म-संस्कृती व समाजासाठी जे अतुलनीय योगदान दिले आहे, ते प्राचीन ऋषी परंपरेला धरूनच आहे. ‘शिल्प’ हा शब्द ‘शील’ धातूपासून तयार झाला आहे. ‘शील’ धातूचा अर्थ दु:ख निवारण करणे हा आहे. मानवाला उपयोगी अशा अनेक वस्तू या जगात आहेत. परंतु, त्या लगेच उपयोगी येत नाही, तर त्यांना उपयोगयोग्य स्वरूप देणे म्हणजे शिल्प. या विद्येचा पहिला शिल्पग्रंथकार म्हणजे कश्यप. यानंतर शिल्पशास्त्रांवर ग्रंथ लिहिणारे एकंदर अठरा आचार्य झाले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांना ‘संहिता’ म्हणतात. यापैकी सध्या कश्यप संहिता, भृगु संहिता व मय संहिता उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही संहितेंप्रमाणे बांधलेली भव्य मंदिरे नाशिकला आहेत. नारोशंकर देऊळ कश्यप संहितेप्रमाणे, सुंदर नारायण मंदिर भृगु संहितेप्रमाणे, तर काळाराम मंदिर मय संहितेनुसार बांधलेले आहे. या वरून अगदी पेशवे काळापर्यंत या तिन्ही संहिता जाणणारे कारागीर होते. शिल्प म्हणजे केवळ मूर्तिकला असे नसून, धातू साधन व वास्तू खंडाअंतर्गत प्रमुख कृषिशास्त्र, जलशास्त्र, खनिजशास्त्र, नौकाशास्त्र, रथशास्त्र, अग्नियानशास्त्र, वेश्मशास्त्र, प्रकारशास्त्र, नगररचनाशास्त्र, यंत्रशास्त्र, या दहा प्रमुख शास्त्राअंतर्गत येणाऱ्या विविध ३२ विद्या आणि ६४ कलांचा विस्तारपट याविषयक ग्रंथातून कृष्णाजींनी विस्तृतपणे मांडला आहे. धर्म-वाणिज्य-इतिहास-शिल्पादी संबंधित जवळपास ४०० प्राचीन ग्रंथांचे संग्रह, अध्ययन, अध्यापन करीत त्यांनी २८ पुस्तके लिहिली व याद्वारे त्यांनी सूक्ष्म तंत्राचा अभ्यास करून भारतीय विद्येच्या अभ्यासाची आधारशीला ठेवली. स्वाभिमान, स्वभाषाभिमान, स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान, असणाऱ्या कृष्णाजींनी भारतीय तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान किती श्रेष्ठ आणि पायाशुद्ध आहे, हे भौतिकशास्त्रांच्या नियमांनीच सिद्ध केले. यासाठी हिंदुस्थानला हवे असणारे स्वराज्य नुसतेच भौगोलिक असून उपयोगी नाही, तर सुराज्यासाठी ते सांस्कृतिक हवे. त्याचा लाभ या देशातील प्रत्येकालाच मिळावा, असा त्यांचा आग्रह होता.

 

‘देश’ व ’धर्म’ या दोन कल्पना नसून ती एकाच वस्तूची दोन अंगे आहेत. या दोहोंचा समन्वय करणारी भारतीय संस्कृती आहे. आपल्या आचारप्रधान धर्माचे रहस्य सशास्त्र समजल्यावाचून कोणालाही धर्म समजला, असे होणार नाही. तेच रहस्य मांडण्याचा प्रयत्न कृष्णाजींनी आपल्या ग्रंथातून केला. एवढेच नव्हे तर अनिष्ट आचारांचे दोषही त्यांनी अगदी निर्भिडपणे दाखवून दिले. प्राचीन काळापासून धर्म आणि व्यवहार परस्परावलंबी होते, असे त्यांचे मत होते. सन १९१६ मध्ये महायुद्ध सुरू झाल्यावर युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रणांगणावर पाठवावे, अशी विनंती कृष्णाजींनी इंग्रज सरकारकडे केली. परंतु, मायबाप सरकारने ती फेटाळली. तेव्हा त्यांनी दोन वर्षांची बिनपगारी रजा टाकून दिली. देहप्रपंच, कुटुंब प्रपंच, राष्ट्रप्रपंच, विश्वप्रपंच यातील प्रत्येक घटकाने आपल्या गुण-कर्म-स्वभाव व योग्यतेनुसार वाट्याला आलेली कामे सलोख्याने पार पाडली तर उच्चतम समाजजीवनाचे ध्येय गाठणे अवघड नाही. याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वत:च्या आचरणाने घालून दिले. त्यांनी स्वत:च्या वाट्याला आलेली कामे स्वधर्माचरण न सोडता निरपेक्षपणे-चिकाटीने व निष्ठेने केली. अगदी बांधकाम खात्यात अधिकारी पदांवर असूनसुद्धा कोणी कंत्राटदाराने साधी फळे जरी भेट म्हणून आणली तरी ती घ्यायची नाही, असा हुकूमच त्यांनी घरच्या लोकांना दिला होता. ही निरपेक्षता आज कुठे आहे? त्यांच्याकडे असलेला ज्ञानाचा आणि ग्रंथाचा संग्रह पाहून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी, आधीच देशहिताची तळमळ असणाऱ्या कृष्णाजींना प्रेरणा दिली आणि नोकरीची सहा-सात वर्षे बाकी असतानासुद्धा त्यांनी राजीनामा देऊन या कार्याला वाहून घेतले. यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी प्रचंड ग्रंथलेखन, नियतकालिकांमधून सहस्त्रावधी लेख आणि शेकडो ठिकाणी व्याख्याने देऊन भारतीय ज्ञानाअंतर्गत असलेले तंत्रज्ञान जगापुढे मांडले. हे ज्ञान भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून शिकवावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही आणि त्यांना या कार्यासाठी अपेक्षेप्रमाणे सहयोग मिळाला नाही. भारतीयांमध्ये असलेल्या अनास्थेचा चांगलाच परिचय त्यांना झाला. या शास्त्रांवर आणखी प्रचंड लेखन बाकी असतानाच ३१ मार्च, १९२९ साली त्यांनी नियतीने नेमून दिलेले कार्य पूर्ण करीत इहलोकाचा निरोप घेतला. भावी स्वराज्याचे सुराज्य कसे व्हावे, या मार्गदर्शनापासून हा देश वंचित राहिला.त्यांच्या असाधारण राष्ट्रकार्याची ओळख समाजाला व्हावी, अशी अपेक्षा असल्याने इतिहासप्रेमी, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी त्यांचे राहिलेले कार्य पुढे नेऊन राष्ट्रसेवेचा ध्वज पुढे न्यावा, अशी विनम्र प्रार्थना आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat