रुग्णाच्या शरीरातील साखळलेले व दूषित रक्त काढून टाकण्यासाठी जळवांचा वापर केला जातो. या उपचारात ‘हिरुडो’ जातीच्या जळवा वापरतात. ज्या भागातील रक्त काढावयाचे असते, तेथे या जळवा ठेवतात.
'
भारतात आढळणार्या जळूचे शास्त्रीय नाव ‘हिरुडिनेरिया ग्रॅनुलेसा’ आहे. भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगला देश इत्यादी देशांमध्ये ही जळू आढळते. ही जळू १० ते १५ सेंमी. लांब असून, तिचा रंग करडा-तपकिरी किंवा तपकिरी-हिरवा असतो. शरीर लांब किंवा अंडाकृती असून, वरून खाली चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे आखडता येते, ताणून लांब करता येते किंवा पसरता येते. जळवेचे तोंड अधर बाजूला असून, त्याभोवती तीन जबडे असतात. प्रत्येक जबड्यावर ८५ ते १२८ सूक्ष्म दात असतात. जळू एकावेळी तिच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेते. जळूमध्ये त्वचेमार्फत श्वसन होते. रक्ताभिसरण संस्थेत रक्तकोठरे असतात. ‘हिरुडो’ व ‘हिरुडिनेरिया’ प्रजातीतील जळवा माणसांच्या किंवा गुरांच्या शरीराला चिकटल्या, तर त्रास होतो. मध्यपूर्व देशांमध्ये गोड्या पाण्यातील ‘लिम्नॅटिस निलोटिका’ जातीची जळू आढळते. नद्यांत व ओढ्यात राहणार्या लहान जळवा प्यायलेल्या पाण्यातून शरीरात शिरतात, तेव्हा नाकपुडीत किंवा घशाच्या भागात चिकटून राहतात आणि तेथून फुप्फुसात प्रवेश करतात. व्यक्तीच्या शरीरात जेव्हा अनेक जळवा शिरतात, तेव्हा त्यांनी शोषलेल्या रक्तामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन पंडुरोग होऊ शकतो. काही वेळा शरीरात शिरलेल्या जळवांमुळे श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होऊन तो प्राणी मृत्युमुखी पडू शकतो. पाळीव गुरे व माणसे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आशिया खंडात घडल्या आहेत. काही जळवा मासे पकडण्यासाठी आमिष म्हणून गळाला लावतात.
जळवा त्यांच्या जबड्यातील सूक्ष्म दातांनी त्या जागी जखम करतात. त्यामुळे रक्त वाहू लागते. जळवा त्यांच्या सवयीप्रमाणे हिरुडिन स्रवतात आणि रक्त शोषून घेतात. स्रवलेल्या हिरुडिनामुळे त्या भागाला बधिरता येते आणि जखमेची वेदना कळून येत नाही. काही शल्यविशारद शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाहित ठेवण्यासाठी हिरुडिनचा वापर करतात. त्वचेतील रक्त साखळले, तर ते वाहते करण्यासाठी हिरुडिनयुक्त मलम वापरण्यात येते. सध्या जळवांच्या लाळेतील ‘पॉलिपेप्टाइड’चा उपयोग हृदय आणि रक्तवाहिन्यांतील रक्ताभिसरणाच्या विकारांवर होऊ शकेल का, यासंबंधी संशोधन चालू आहे.