१६ ते १८ जून रोजी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा

    दिनांक  10-May-2017   


 

‘मिशन २०१९’ वर होणार राज्यव्यापी विचारमंथन

 

देशव्यापी दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे येत्या जून महिन्यात दि. १६, १७ व १८ जून रोजी महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. २०१९ मधील लोकसभा तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या तयारीचा शाह यावेळी सविस्तर आढावा घेतील. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यारिणीतील विश्वसनीय सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

देशात लोकसभा-विधानसभांपासून ते पंचायती-स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वत्र विजयी घोडदौड करत असलेला भारतीय जनता पक्ष सध्या ‘मिशन २०१९’च्या तयारीला लागला आहे. देशात सध्या भाजपला अनुकूल वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची लाट कायम आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा हा प्रभाव कायम राहण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे या वातावरणाचा फायदा घेऊन २०१९ च्या लोकसभेतही २०१४ पेक्षा मोठे यश मिळवण्यासाठी भाजप नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे पक्ष संघटनेची पुनर्बांधणी, अगदी बूथ स्तरापर्यंत सक्षम प्रचारयंत्रणेची उभारणी, भाजप सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध जनसंपर्क अभियानांचे नियोजन आदी तयारी पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सध्या तब्बल ९० दिवसांच्या राष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्याचा भाग म्हणून ते १६, १७ व १८ जून असा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

अमित शहांच्या या दौऱ्याच्या तारखा जवळपास निश्चित झाल्या असून आता त्याची केवळ औपचारिक घोषणा करण्याचे बाकी असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय अध्यक्षांच्या या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठकही होण्याची शक्यता आहे. अमित शाह या दौऱ्यादरम्यान मुंबईत सलग बैठका घेऊन राज्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील. तसेच ते राज्यातील काही निवडक मतदारसंघांमध्ये स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याचीही शक्यता आहे. याशिवाय भाजपमध्ये येण्यास उत्सुक असलेल्या इतर पक्षांतील बड्या नेत्यांबाबत काही निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घेणे व युतीमधून शिवसेनेला ‘डच्चू’ देण्याबाबत भाजप नेतृत्व सध्या गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द अमित शाह हेच ३ दिवसांच्या राज्य दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

 

निमेश वहाळकर