मुंबई : (Vadhavan Port) वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता मुंबई, उपनगरांसह विविध भागांतील प्रकल्पविरोधकांची साथ मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिकांच्या प्रश्नांना पुढे करून बाहेरील आंदोलकांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आंदोलनापासून दूर असलेल्या स्थानिकांकडून केला जात आहे. परिणामी, वाढवणविरोधातील आंदोलनाच्या स्थानिक स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जेएनपीटीमधील न्यायप्रविष्ट प्रकरणांशी संबंधित काही प्रकल्पग्रस्त, तसेच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या मुद्द्यावर सक्रिय असलेले कार्यकर्ते आणि विरोधक वाढवण बंदरविरोधी आंदोलनात सहभागी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही चेहरे आंदोलनाच्या मंचावर उपस्थित असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. यापूर्वी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना विरोध करणारे काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आता वाढवणविरोधातही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. (Vadhavan Port)
प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या स्थानिकांच्या मते, नवी मुंबई विमानतळ झाले, जेएनपीटी बंदर झाले, अटल सेतू आला आज नवी मुंबईत मेट्रो ही आहे. एका जेएनपीटी बंदरामुळे आज नवी मुंबई परिसर वेगाने बदलतो आहे. नवी मुंबई आणि मुंबई अगदी जवळ आले आहेत. अनेक रोजगार याठिकाणी आहे. आमच्या परिचयातील अनेकांना जेएनपीटी, बेलापूर, ऐरोली याभागात नोकऱ्या मिळाल्या आहे. आता तर नवी मुंबई विमानतळामुळे आणखी सुविधा भविष्यात याभागात दिसून येतील. मात्र असे असतानाही नवी मुंबईतील काही राजकीय विरोधक नेते पालघरमध्ये येऊन आमच्या इथे होणाऱ्या विकासाला विरोध करत आहेत. (Vadhavan Port)
हे पाहता आंदोलनात सहभागी होणाऱ्यांपैकी प्रत्यक्ष वाढवण परिसरातील स्थानिक किती आणि बाहेरील घटक किती? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या उपजीविका, पर्यावरण आणि मच्छीमारांच्या प्रश्नांवर आंदोलन होत असल्याचा दावा केला जात असताना आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी बाहेरील कार्यकर्त्यांना पाचारण केले जात असल्यास स्थानिकांच्या भूमिकेचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Vadhavan Port)
जनसुनावणीतही बाहेरील आंदोलकांचा मुद्दा
काही दिवसांपूर्वी ही जनसुनावणीदरम्यानही बाहेरील आंदोलकांच्या सहभागाचा मुद्दा चर्चेत आला होता. नाशिकहून आलेल्या एका निसर्गप्रेमी आंदोलकाला स्थानिकांनी जनसुनावणीच्या ठिकाणाहून हाकलून दिल्याचा दावा करणारे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. या व्हिडीओंची स्वतंत्र पुष्टी झालेली नसली, तरी बाहेरील व्यक्तींच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Vadhavan Port)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.