विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत चांगलेच सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली असून, त्यांच्याविरोधात अपक्ष म्हणून गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे दराडे यांची शेवटच्या दिवसापर्यंत चांगलीच दमछाक होईल, असे सध्या निर्माण झालेल्या चित्रावरून स्पष्ट होते. प्रसाद हिरे यांनी त्यांची नाराजी शिवसेना शिंदे पक्षावर नसून, दराडे यांच्यावर असल्यानेच उमेदवारी अर्ज भरल्याचे माध्यमांना सांगितले. तर, गोकुळ गिते यांनी दराडे यांचे पुत्र कुणाल यांनी बाप काढल्याने, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सांगत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय ताकदीची न राहता, व्यक्तिमत्त्व आणि स्थानिक नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेची कसोटी ठरत आहे.
गिते आणि हिरे यांनी प्रचारादरम्यान विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधल्याचा दावा केला. यातून अनेक सदस्यांनी महायुतीच्या धोरणांबाबत आंणि राज्य सरकारच्या कामकाजाविषयी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असली, तरी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेबाबत असमाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार निवडीमध्ये स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि मतांचा पुरेसा विचार न झाल्याने, स्थानिक पातळीवरील काही सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असल्याने वैयक्तिक संबंध, स्थानिक कामे आणि नेतृत्वाची प्रतिमा यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे मतदारांमध्ये बदलाची भावना असल्याचे सांगत, निवडणुकीत अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागू शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, महायुतीकडून नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीला व्यापक पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. आता राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिश्मा असला, तरी नाशिकमधून विधान परिषदेची पायरी कोण चढणार? हे दि. 22 जूनलाच स्पष्ट होईल.
संकटमोचक मैदानात
एकीकडे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास नकार देत आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले असून, प्रसाद हिरे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत. दराडे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः मैदानात उतरले असून, त्यामुळे त्यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात अनेकवेळा गुंतागुंतीची राजकीय समीकरणे सोडवणारे आणि पक्षासाठी अडचणीच्या परिस्थितीत प्रभावी भूमिका बजावणारे नेते म्हणून, गिरीश महाजन यांची ओळख आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीतही महायुतीने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुकीत, अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायकच मानली जाते. अनेक नगरपालिकांतील सदस्य कोणत्या बाजूने मतदान करतात, यावरच निकालाचे गणित अवलंबून असते.
दुसरीकडे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हेदेखील आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून, मतदारांच्या दाराशी जात त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचार वाढल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच मतदार आपल्यालाच निवडून देतील, असा विश्वासही गिते यांच्याकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गिते यांना शांत करण्यासाठी, मंत्री उदय सामंत मागील तीन ते चार दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्या मंत्री गिरीश महाजनांसोबत बैठकांच्या फैरी झडत असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या संघर्षामुळे नाशिक विधान परिषद निवडणूक ही केवळ पक्षीय लढत न राहता संपर्क, समन्वय आणि राजकीय रणनीतीची एक परीक्षाच ठरत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गिरीश महाजन यांचे मैदानात उतरणे महायुतीसाठी महत्त्वाचे मानले जात असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अंतिम निकालावर निश्चित परिणाम होतो, असे राजकीय जाणकारांकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या निवडणुकीतील घडामोडी अधिकच रंगतदार होण्याची शक्यताही आहे.