संघकार्य, बँकिंग, संगीत अन् कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा जपणारे वसईतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व, 'समाजव्रती' हभप सुयोग आपटे यांचा जीवनप्रवास...
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती।
देह कष्टविती परउपकारें ।।
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग ज्यांना तंतोतंत लागू पडतो, असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे हभप सुयोग दत्तात्रेय आपटे ! वसई तालुक्यातील आगाशी येथील सुयोग दत्तात्रेय आपटे यांनी नुकतीच दि. ३० एप्रिल रोजी आपल्या वयाची ६० वर्षे पूर्ण केली असून, याच दिवशी ते 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मधील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेतून निवृत्त झाले आहेत.
सुयोग आपटे यांचा जन्म आगाशी येथील दि. ३ एप्रिल १९६६ रोजी प्रतिष्ठित आपटे परिवारात झाला. एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर एकमेकांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि सामाजिक उपक्रमांत हिरिरीने भाग घेणे यांसारखे उत्तम संस्कार झाले. त्यांचे शालेय शिक्षण आगाशी येथील के. जी. हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनात ते अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. केवळ अभ्यासातच नव्हे; तर गायन, वक्तृत्व आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी नेहमीच प्रथम क्रमांकाची बक्षिसे पटकावली. त्यांचा मनमिळाऊ, शांत आणि हसतमुख स्वभाव आजूबाजूच्या सर्वांनाच आकर्षित करणारा होता. त्यांनी १९८१ मध्ये 'एसएससी' आणि १९८३ मध्ये वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर १९८६ मध्ये एम. एल. डहाणूकर महाविद्यालयातून त्यांनी 'बीकॉम'ची पदवी संपादन केली.
घरातील राष्ट्रभक्तीच्या वातावरणामुळे सुयोग आपटे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यांनी १९८३ ते १९८५ या तीन वर्षांच्या कालावधीत संघाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. जेव्हा ते आगाशी शाखेचे मुख्य शिक्षक होते, तेव्हा त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाखेतील उपस्थिती नेहमी ४० ते ५० स्वयंसेवकांच्या वर असायची.
९८८-८९ या काळात पूजनीय डॉक्टरांच्या (डॉ. हेडगेवार) जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी एक वर्ष पूर्णवेळ 'संघप्रचारक' म्हणून देशसेवा केली. संघात त्यांनी जिल्हा शारीरिक शिक्षणप्रमुख, जिल्हा घोषप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचा आवाज अत्यंत मधुर असल्यामुळे संघाचा कोणताही उत्सव, बैठक किंवा कार्यक्रम असो, वैयक्तिक गीत गाण्याचा मान सुयोग यांनाच मिळायचा. सध्या देशभरात 'वन्दे मातरम्'चे १५०वे वर्ष साजरे होत आहे. मात्र, सुयोग आपटे हे १९९० पासूनच संपूर्ण 'वन्दे मातरम्' गीत अत्यंत सुरेल आवाजात गाऊन संपूर्ण सभा मंत्रमुग्ध करत आले आहेत. अयोध्या येथील १९९० व १९९२ची कारसेवा असो, दिल्ली बोट क्लब येथील भव्य मेळावा असो वा संघाचा कोणताही आंदोलनात्मक कार्यक्रम, सुयोग यांनी नेहमीच अग्रभागी राहून उपस्थिती दर्शवली आहे. १९८९ मध्ये सुयोग आपटे 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये रुजू झाले. बँकेत काम करताना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक आपली कर्तव्ये पार पाडली. बँकेच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा आवर्जून सहभाग असायचा.
बँकेची नोकरी सांभाळत असतानाच, त्यांनी कीर्तनाची पदवी प्राप्त केली आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे पवित्र कार्यही सुरू केले. आज ते वसई, विरार परिसरामध्ये 'हभप सुयोग महाराज' म्हणून अत्यंत आदराने ओळखले जातात. कीर्तन हे अनादी काळापासून भारताचे प्रभावी प्रबोधन माध्यम राहिले आहे आणि सुयोग महाराज याच माध्यमाद्वारे अत्यंत तळमळीने हिंदू धर्माचा प्रचार आणि समाजजागृती करत आहेत. आगाशी येथील दीपोत्सव, रांगोळी स्पर्धा किंवा कोणताही सामाजिक-धार्मिक कार्यक्रम असो, सुयोग यांचा सहभाग तिथे निश्चित असतो. धर्मरक्षण, धर्मप्रसार आणि धर्मजागरण हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. एकीकडे संघकार्य, दुसरीकडे बँक आणि समाजप्रबोधन करत असताना, सुयोग यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळल्या. त्यांना कोणावरही रागावताना आजपर्यंत कोणीही पाहिलेले नाही. त्यांच्या या प्रवासात त्यांची धर्मपत्नी साधना आपटे (ज्या कोर्टात कार्यरत आहेत) यांनी मोलाची साथ दिली. सुयोग यांनी त्यांचे सुपुत्र ऋषिकेश यांना उच्चशिक्षण देऊन डॉक्टर बनवले; आज ते 'एमबीबीएस', 'एमडी' असून, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत आहेत.
दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या त्यांच्या भव्य निरोप समारंभाच्या निमित्ताने सेंट्रल बँकेतील त्यांचे सहकारी-कर्मचारी, आगाशी व जिल्ह्यातील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. निवृत्तीनंतरचा पुढील काळ हा कोणत्याही मानधनाशिवाय केवळ समाजकारण, समाजकल्याण, समाजप्रबोधन आणि हिंदुत्वाच्या कार्यासाठी वाहून घेण्याचा सुयोग यांचा संकल्प नक्कीच वाखाणण्याजोगा आणि प्रेरणादायी आहे. अशा या अष्टपैलू, धर्मनिष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील उदंड आणि सुयशस्वी सामाजिक वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत' परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
- कमलेश संखे