उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे, तर आदित्य प्रवृत्तीमुळे मागे पडले : सुशील कुलकर्णी

    19-Jun-2026   
Total Views |
Thackeray Leadership Under Scrutiny 
 
शिवसेनेतील २०२२च्या ऐतिहासिक फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, आता पुन्हा एकदा पक्षातील काही खासदारांच्या फुटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उबाठा गटातील नऊपैकी सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकेकाळी महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता आपले स्थान टिकवणे अवघड का झाले आहे? उबाठाचे राजकीय भविष्य काय असेल? याविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांची ही रोखठोक मुलाखत...
 
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा उबाठा गटात फूट पडली. नऊपैकी सहा खासदार फुटीच्या मार्गावर आहेत. तेव्हा, एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही या घटनाक्रमाकडे कसे पाहता?
 
आधी शिवसेनेत फूट पडली, त्यातून वेगळी शिवसेना जन्माला आली आणि उबाठा हा गट उरला. आता या उरलेल्या गटालासुद्धा एका फुटीचे ग्रहण लागले. मला वाटते, अजून काही दिवसांनंतर या गटात कदाचित तिसरी फूट पडू शकते. त्यामुळे या गटाचे छोटेछोटे तुकडे होणार असून, या सगळ्या तुकड्यांना मूळ शिवसेना पक्ष गिळंकृत करणार आहे. ठाकरेंच्या हातातून शिवसेना काढून, ती मूळ शिवसेना आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या हातात दिली गेली. आता मूळ शिवसेनेची सगळीच माणसे काढून घेऊन शिंदेंकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेवरचा दावा हा शिंदेंचा होता, शिंदेंचा राहील आणि शिंदेच या पक्षाचे सध्यातरी प्रमुख राहतील. ठाकरेंच्या हातातून सेना निघून गेलेली आहे. ठाकरेंवर शिवसैनिकांचा विश्वास उरलेला नाही, हेच यानिमित्ताने स्पष्टपणे दिसते. ज्याला-ज्याला संधी मिळेल, तो-तो प्रत्येकजण ही शिवसेना तोडण्यासाठीचे प्रयत्न करतच राहील.
 
उबाठामधील या फुटीमागची कारणे नेमकी काय असावीत?
 
सामान्य जनता या फुटीसाठी जबाबदार धरते ती एकनाथ शिंदेंना किंवा भाजपला. पण, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेच या फुटीमागची प्रमुख कारणे आहेत. आपल्याच घरातल्या टीव्हीवर रोज संजय राऊतांच्या शिवीगाळीची भाषा ऐकावी लागते. तेव्हा या फुटीला शिंदे, भाजप किंवा दुसरा कोणीही जबाबदार नसून, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नीतीच सर्वस्वी जबाबदार आहे. लोकांना त्या नेतृत्वात विश्वास, प्रेम किंवा आपले काही भले होऊ शकेल असे वाटत नाही. आपला नेता ज्या रस्त्याने जातो आहे, तो रस्ता सरळ-सोपा असला पाहिजे किंवा यशाकडे घेऊन जाणारा असला पाहिजे. एखाद्या जहाजाला छिद्र पडले, तर त्या जहाजात कोण बसेल? उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे छिद्र पडलेले जहाज आहे आणि त्यांच्याकडे एकही कुशल नाविक नाही. आज उद्धव ठाकरे, ‘माझ्या हातात काहीच नाही, माझी प्रकृती खराब आहे,’ असे सांगतात. आदित्य ठाकरेंकडे जरा विश्वासाने बघावे, तर त्यांच्यात तो विश्वास दिसत नाही. संजय राऊतांसारखा माणूस काहीही बोलत राहतो. अशा वेळी या लोकांची फूट, त्यांचे बाजूला पडणे स्वाभाविक आहे. याला जबाबदार फक्त आणि फक्त ठाकरे, ठाकरे आणि ठाकरेच आहेत!
 
उद्धव ठाकरे जरी गेल्या काही वर्षांत प्रकृतीच्या कारणांमुळे सक्रिय राजकारणापासून लांब राहत असले, तरी युवराज आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करूच शकतात. परंतु, त्यांचे राजकारणही केवळ मुंबई आणि त्यातही त्यांच्या वरळी मतदारसंघापुरतेच मर्यादित आहे, असे वाटते का?
 
उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे मागे पडलेत, तर आदित्य ठाकरे प्रवृत्तीमुळे! प्रकृती आणि प्रवृत्ती या दोन गोष्टी आहेत. यांची ‘प्रवृत्ती’ महाराष्ट्राला माहितीच नाही. यांचा उभा आणि आडवा महाराष्ट्र नाशिकच्या किंवा पुण्याच्या पलीकडे सरकतच नाही. या माणसाला महाराष्ट्र कळलेला नाही. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ म्हणून ती उद्धव ठाकरेंकडे आली. त्यानंतर ती आदित्य ठाकरेंकडे गेली. अशा वारशाने आलेल्या माणसांना या सगळ्या गोष्टी समजणे कठीण जाते. त्यामुळे आपण जेवढे जमा करू शकू, तेवढे करून ते सुरक्षित ठेवून शिल्लक ठेवावे. पण, आदित्य ठाकरेंचे असे झाले आहे की, महाराष्ट्रात सगळे बाहेर पडले आहे आणि त्यांना काय-काय सुरक्षित ठेवू, हा प्रश्न पडलाय. त्यामुळे त्यांची बौद्धिक, शारीरिक झेप जिथपर्यंत आहे, तेवढेच ते जगतात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील नेत्यांना ऊर्जा देता यावी, असे आदित्यकडे काहीच नाही. आपण आपली वरळी सांभाळली तरी पुरे झाले, असे त्यांना वाटते. आदित्य ठाकरे धडपडून बाहेर पडतील आणि कामाला लागतील, ही स्थिती नाही. त्यामुळे ते वरळीपुरते आणि आता वरळी सोडून वांद्य्रातील ‘मातोश्री’पुरते मर्यादित राहतील.
 
राजकीय विश्लेषक म्हणून मग ठाकरेंचे नेमके कुठे चुकतेय असे वाटते?
 
उद्धव ठाकरेंना आता आई भवानीची शपथ आठवली. मागच्या सहा वर्षांमध्ये यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? मुळात ‘मी सांगितलेले लोकांनी ऐकलेच पाहिजे,’ हा त्यांचा भ्रम त्यांच्या पक्षाला मारतोय. ’मी आदेश दिला, तसेच झाले पाहिजे’ असे नसते. तुमचा आदेश पाळणारी माणसे, त्यांच्या असण्या-नसण्याचा आणि त्यांच्या काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. शिवसेनेत ‘संपर्कप्रमुख’ नावाची पद्धत सुरू झाली. हा संपर्कप्रमुख जिल्हापातळीवर संपर्क करण्यासाठीचा प्रमुख होता. पण, पुढे ठाकरेंशी संपर्क असलेला माणूसच प्रमुख होत गेला. ते म्हणतील, तेच काम केले गेले आणि तिथेच खरी गडबड झाली. उद्धव ठाकरेंनी स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचे निर्णय ‘फॉलो’ करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांनी दिलेले ‘बाळकडू’ विसरले आणि ‘पाटणकर काढा’ सुरू केला आणि इथेच त्यांची मोठी चूक झाली.

२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील विरोधकांचा प्रमुख चेहरा होते. या फुटीनंतर आता मविआमध्ये ती जागा कोण घेईल असे वाटते?
 
आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, ‘न मामू, नकटे मामू’ म्हणजे, ‘कुणीच नाही, यापेक्षा कुणीतरी असलेले बरे.’ त्यामुळे विरोधकांच्या वतीने उद्धव ठाकरेंना चेहरा बनवण्यात आले. काँग्रेसकडे खर्च करू शकणारा कोणताही चेहरा नव्हता. शरद पवार गटाकडे उरलेला चेहरा इतका धूसर झाला की, तो चेहरा म्हणूनही सांगता येत नाही. अशा वेळी ठाकरेंना अपरिहार्यपणे चेहरा म्हणून देण्यात आले. आता या चेहर्‍याला पर्याय हवा असल्यास पुन्हा नव्याने माणूस शोधावा लागेल आणि तेवढा निष्ठेने वैर निभवणारा माणूस आता उरलाय का? त्यामुळे आता कदाचित, महाविकास आघाडीला एखादा नवीन माणूस घेऊन काहीतरी करावे लागेल.
 
तुमच्या मते, महाविकास आघाडीत राहिल्यामुळे उबाठा गटाला फायदा झाला की तोटा?
 
‘महाविकास आघाडी’ नावाच्या सगळ्यांनी एकत्रितपणे ‘उद्धव ठाकरे’ या नावाची शिवसेना संपवलेली आहे. ‘मविआ’त गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नावापुढे ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद लागले, एवढाच काय तो त्यांना फायदा झाला. पण, त्यांनी आपले मूळ गमावले असून, हा त्यांचा सर्वांत मोठा तोटा म्हणावा लागेल. त्यांच्या कमावण्याच्या यादीपेक्षा गमावण्याची यादी खूप मोठी आहे. बाळासाहेबांचा वारसा हा जन्माने उद्धव ठाकरेंचा असेल; पण तो कर्माने एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा जन्माचा वारसा कदाचित पटलाआड होईल; पण त्यांच्या कार्याचा वारसा पटलाच्या आड होणे अवघड आहे. एकनाथ शिंदे या पक्षाला सांभाळतात, वाढवतात, ‘या चिमण्यांनो परत फिरा’ म्हणत, लोकांना आपल्यात समावून घेऊन पुढे नेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण पटलाआड होऊ शकते; पण शिवसेनेचे राजकारण नाही.
 
यापुढे उबाठा गट आणि एकूणच ठाकरे कुटुंबाचे राजकीय भवितव्य काय असेल?
 
उबाठा गट हा उबाठा गटच राहील- उद्धव, बाळासाहेबांचे नाव आणि ठाकरे! या ‘आणि ठाकरे’ शब्दांत आदित्य, तेजस, रश्मी असे लोक असतील. त्यामुळे उबाठा गटाचे एवढेच अस्तित्व असेल. राहिला प्रश्न ठाकरे परिवाराचा; तर ठाकरे परिवाराचे राजकारण त्या परिवारानेच जवळपास संपुष्टात आणले आहे. त्यामुळे राजकारणात दखल घेता येईल, एवढेच त्यांचे अस्तित्व राहील. सगळे संपेल, असा दावा मी करत नाही. पण, तो पक्ष त्यांच्या घरापुरता आणि माध्यमांमध्ये झळकण्यापुरता मर्यादित असेल. बाकी फारसे अस्तित्व उरण्याची शक्यता कमीच!
 
हे सगळे पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजप घडवून आणतो, अशी टीका होते. याबद्दल तुमचे मत काय?
 
आपण सगळ्याच बाजूने विचार करू. भाजपने तृणमूल काँग्रेस फोडली आणि एका नवीनच ‘एनसीपीआय’ नावाच्या पक्षात त्यांना विलीन केले. भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून शिंदेंची शिवसेना निर्माण केली. भाजपने शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ फोडून नवीन राष्ट्रवादी निर्माण केली, अशी वाक्ये नेहमीच उच्चारली जातात. आता पुन्हा उद्धव ठाकरेंचे खासदार फोडले आणि पुढचा नंबर शरद पवारांच्या पक्षाचा आहे, असे म्हणतात. त्यानंतर पुढचा नंबर समाजवादी पक्षाचा आहे. पण, या सगळ्यात एक प्रश्न आहे. तो म्हणजे, भाजपने हे करावे की करू नये?
 
२०१९ला भाजप आणि शिवसेनेला प्रचंड बहुमत मिळाले. पण, भाजपला सत्तेपासून दूर ठेवत उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे सत्ता उपभोगली. तेव्हा त्यांनी कोणत्या नीतिमत्तेने सत्ता उपभोगली होती? पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या किती कार्यकर्त्यांचे बळी गेले? शरद पवारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा किती प्रयत्न केला आणि कितीवेळा अडकवण्याचा प्रयत्न केला? मग चांगुलपणाची अपेक्षा फक्त भाजपकडूनच का करायची? देशातील मतदारसंघ पुनर्रचना आणि महिलांना आरक्षण देणारे विधेयक अत्यंत अपमानास्पद पद्धतीने सभागृहात संमत होऊ दिले नाही. मग, भाजपने लोकांना दिलेल्या वचनांचे काय? ही वचने पूर्ण करायची असल्यास भाजपला ही फोडाफोडी करावी लागेल. उलट, एक राजकीय विषयाचा अभ्यासक म्हणून मी भाजपला आवाहन करतोय, जमेल तेवढे फोडा आणि याआधी तुम्हाला जे करू दिले गेले नाही, ते सगळे करून घ्या. मतदारसंघ पुनर्रचना कायदा मंजूर करून घ्या, महिलांना आरक्षण द्या, ‘पीओके’ भारतात घेण्यासाठीचे प्रयत्न करा. भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष आहे, तो सामाजिक संस्कार वर्ग चालवणारा नाही आणि राजकीय पक्षाला आपले इच्छित साध्य करून घ्यायचे असते. त्यामुळे भाजपने हे करून घेणे चूक आहे, असे मला वाटत नाही. या सगळ्याच्या मागे भाजप असेल, तर ‘शाब्बास भाजप!’ असेच म्हणायला हवे.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....